मोलकरीणने लांबविले ९५ हजारांचे दागिणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 02:19 PM2019-01-10T14:19:50+5:302019-01-10T14:25:07+5:30
काही दिवसांपुर्वी सातपूर भागात अशाच पध्दतीने तीन ते चार मोलकरणींनी मिळून लाखो रुपयांच्या दागिण्यांचा अपहार केल्याची घटना घडली होती.
नाशिक : घरकामासाठी मोलकरीण ठेवताना संबंधितांनी तिचे काही मुळ कागदपत्रांच्या सत्यप्रती मागवून घेणे गरजेचे आहे. शहरात दुसऱ्यांदा मोलकरीणकडून ९५ हजारांचे दागिण्यांसह दहा हजाराची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीसांनी संशयित मोलकरीणविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, अनुश्री मदन क्षत्रीय (३४, भिकुसा भवन, सीबीएस) यांच्या राहत्या घरात मोलकरीण शोभा (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) हिने सुमारे ९५ हजारांचे दागिणे आणि दहा हजाराची रोकड असा एकूण १ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी क्षत्रीय यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित शोभाविरुध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. शोभा ही मोलकरीण म्हणून घरकामासाठी क्षत्रीय यांच्याकडे येत होती. बुधवारी (दि.२) संशयित शोभा हिने राहत्या घरात क्षत्रीय यांच्या आईच्या खोलीत जाऊन कपाटामधील ४० हजाराचे २०ग्रॅम वजनाचे डायमंड असलेले सोन्याचे मंगळसुत्र, ३५ हजार रुपये किंमतीचे १५ग्रॅमचे डायमंड खडे असलेले मंगळसुत्र तसेच २० हजार रुपये किंमतीचे दहा ग्रॅमचे कानातील सोन्याचे टॉप्स व दहा हजार रुपये रोख रक्कम असा एकूण १ लाख ५ हजार रुपये किंमतीचा ऐवज लांबविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पुढील तपास सहायक निरिक्षक गिरमे करीत आहेत.
काही दिवसांपुर्वी सातपूर भागात अशाच पध्दतीने तीन ते चार मोलकरणींनी मिळून लाखो रुपयांच्या दागिण्यांचा अपहार केल्याची घटना घडली होती. यामुळे मोलकरीण घरात ठेवताना नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. मोलकरीणचे पुर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्रमांकासह आधारकार्ड, मतदान कार्डासारखे महत्त्वाच्या पुराव्यांच्या सत्यप्रती स्वत:जवळ बाळगणे गरजेचे असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. काही गुन्हा घडल्यास संबंधितांवर संशय बळावल्यास पोलिसांना पुढील तपासासाठी अशा कागदपत्रांच्या पुराव्यांमुळे मदत होऊ शकते तसेच मुळ कागदपत्र घेऊन ठेवल्यामुळे मोलकरीणवरदेखील मानसिकदृष्ट्या एक दबाव तयार झालेला असतो त्यामुळे गुन्हा करण्यापुर्वी ती घाबरते असे पोलिसांचे म्हणणे आहे