९८ टक्केच काम पूर्ण : डिसेंबरअखेर मुक्ती अवकाळी पावसाचा खड्डेमुक्तीला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 00:56 IST2017-12-22T00:55:59+5:302017-12-22T00:56:38+5:30
नाशिक : जिल्ह्यात ओखी चक्रीवादळामुळे सर्वदूर झालेल्या पावसाचा फटका शेतीपिकांना बसण्याबरोबरच सार्वजनिक बांधकाम खात्याने हाती घेतलेल्या खड्डेमुक्ती अभियानालाही बसला असून, सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे जाहीर केले गेले

९८ टक्केच काम पूर्ण : डिसेंबरअखेर मुक्ती अवकाळी पावसाचा खड्डेमुक्तीला फटका
नाशिक : जिल्ह्यात ओखी चक्रीवादळामुळे सर्वदूर झालेल्या पावसाचा फटका शेतीपिकांना बसण्याबरोबरच सार्वजनिक बांधकाम खात्याने हाती घेतलेल्या खड्डेमुक्ती अभियानालाही बसला असून, सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे जाहीर केले गेले असले तरी, नाशिक जिल्ह्यामध्ये आणखी दोन टक्के काम अपूर्ण असून, डिसेंबरअखेर काम पूर्ण होण्याची शक्यता सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधीक्षक अभियंता आर. आर. हांडे यांनी व्यक्त केली आहे. राज्यात पावसाळ्यात प्रमुख राज्य महामार्ग व जिल्हा मार्गाच्या दुरवस्थेवरून विरोधी पक्षांनी व विशेषत: राष्ट्रवादी कॉँग्रेसने ‘खड्डे विथ सेल्फी’ अभियान राबवून राज्य सरकारला जेरीस आणले होते. खराब रस्त्यांमुळे होणाºया लहान-मोठ्या अपघातात अनेकांना जीव गमवावा लागल्याने शासनाने खड्डे बुजवावेत, अशी मागणीही जोर धरू लागली होती. त्यातूनच सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी १५ डिसेंबरपर्यंत राज्य खड्डेमुक्त करण्याचे जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम खात्याने प्रमुख राज्यमार्ग व जिल्हामार्गावरील खड्ड्यांची माहिती मागविली होती.
अभियानात फक्त खड्डे बुजविण्याचेच काम
या खड्डेमुक्ती अभियानात फक्त खड्डे बुजविण्याचेच काम हाती घेण्यात आले आहे, मात्र ज्या मार्गावर अवजड वाहनांची वर्दळ आहे त्या मार्गावरील डांबर निघालेले असेल तर ते या अभियानात दुरुस्त करणे अपेक्षित नाही, त्यासाठी नवीन रस्त्याचे बळकटीकरण हेच गृहीत धरण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधीक्षक अभियंता आर. आर. हांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
नाशिक जिल्ह्यातून जाणाºया राज्यमार्गाची लांबी १६८० किलोमीटर इतकी असून, प्रमुख जिल्हा मार्ग २५०० किलोमीटरचा आहे. राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार सुमारे ३५ कोटी रुपये खड्डे बुजविण्यासाठी खर्च होणार आहे. याकामी ठेकेदाराची नेमणूक करून राज्यमार्गाचे १६६० किलोमीटरचे व प्रमुख जिल्हामार्गाचे २२५२ किलोमीटर अंतरातील खड्डे बुजविण्यात आले आहेत. तसेच ज्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले, त्याच ठिकाणी पुन्हा खड्डा पडल्यास तो वर्षभरात बुजविण्याची जबाबदारी ठेकेदारावर निश्चित करण्यात आली आहे.