९ महिन्यात ९ लाखांचा दंड वसूल, १३०० किलो प्लास्टिक जप्त
By Suyog.joshi | Published: October 18, 2023 02:16 PM2023-10-18T14:16:06+5:302023-10-18T14:16:28+5:30
मनपा घनकचरा व्यवस्थापन विभागाची कडक कारवाई
नाशिक (सुयोग जोशी) : ऐन सणासुदीच्या पाश्र्भूमीवर प्लास्टिक विक्रेत्यांविरोधात महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने कडक पावले उचलली असून गेल्या ९ महिन्यात सहा विभागांमध्ये सुमारे ९ लाख रुपयांचा दंड वसूल केला असून १३०० किलो प्लास्टिक जप्त केले आहे.
शहरात वाढत्या प्लास्टिक वस्तूंच्या वापरामुळे प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे पर्यावरणाला मोठी हानी पोहोचत असून शहरात घनकचऱ्याची समस्या वाढल्याने महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाने यासंदर्भात कठोर पावले उचलली आहेत. प्लास्टिकसारख्या अविघटनशील कचऱ्यामुळे मानवी तसेच निसर्गावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता महापालिका क्षेत्रात पुर्णत: प्लास्टिक बंदी केल्यानंतरही त्याचा सर्रास वापर होत आहे.
विशेष म्हणजे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने संपूर्ण प्लास्टिक बंदीच्या दिशेने वाटचाल सुरू केली असून त्याचाच एक भाग म्हणून गेल्या ९ महिन्यांमध्ये १३०० किलो प्लास्टिक जप्त करून ९ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे अस्वच्छता करणारे नागरिक आणि आस्थापनांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ.आवेश पलोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात येत आहे.
अस्वच्छता करणाऱ्यांना दणका
शहरात स्वच्छता राखण्यासासाठी भाजी मार्केट, बाजारपेठ, शहरातील विविध चौक, फुटपाथ, गर्दीची ठिकाणे येथे मनपाची पथके लक्ष ठेऊन आहेत. अस्वच्छता करणाऱ्यांकडून दंड वसुल केला जात आहे. विलगीकरण न केलेला आणि वेगळ्या डब्यांमध्ये साठवण न केलेला कचरा सोपवल्याबद्दल, नदी, नाले येथे अस्वच्छता करणारे, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणारे, रस्ते मार्गावर अस्वच्छता करणे, पाळीव प्राण्यांमुळे रस्त्यावर घाण करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणे, उघड्यावर लघुशंका करणे आदी संदर्भात ही कारवाई करण्यात आली आहे.
सध्या नवरात्रोत्सव, दसरा दिवाळी यासारखे सण उत्सव साजरे होणार आहेत. या काळात सिंगल युज प्लास्टिकचा वापर विक्रेत्यांकडून होऊ शकतो, मात्र ग्राहकांनी या संदर्भात काळजी घ्यावी. हातगाडीवाले, फुल व फळ विक्रेते, भाजीविक्रेते, विविध प्रकारच्या छोट्या - मोठ्या वस्तू रस्त्यालगत विकणाऱ्या दुकानदारांनी सिंगल युज प्लास्टिक पिशवीचा वापर टाळावा. नागरिकांनी, विक्रेत्यांनी आपले शहर स्वच्छ, सुंदर ठेवण्यासाठी मनपाला सहकार्य करावे.
- डॉ. आवेश पलोड, संचालक मनपा घनकचरा व्यवस्थापन.