२९ पैकी नऊ जागांवरच अनुकूलता?
By admin | Published: January 29, 2017 01:02 AM2017-01-29T01:02:24+5:302017-01-29T01:02:38+5:30
भाजपा सर्वेक्षण : विष्णू सावरांची परीक्षा
गणेश धुरी : नाशिक
भारतीय जनता पार्टीने जिल्हा परिषद निवडणुकांसाठी ‘मिशन-४१’चे टार्गेट ठेवले असून, त्यातील बहुतांश गट हे अनुसूचित जमाती संवर्गातून निवडून आणण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्या खांद्यावर या २९ अनुसूचित जमाती गटांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे; मात्र त्यातील अवघ्या नऊ गटांतच पक्ष भक्कम स्थितीत असल्याचे खुद्द भाजपाच्याच सर्वेक्षणातून उघड झाल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक महापालिका व जिल्हा परिषद यांच्यावर कोणत्याही परिस्थितीत सत्ता आणण्यासाठी विविध प्रकारच्या व्यूहरचना आखल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार वसंत गिते यांच्या खांद्यावर नाशिक महापालिका, तर दुसरे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल यांच्यावर नाशिक जिल्हा परिषदेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यातही जिल्हा परिषदेच्या ७३ गटांपैकी अनुसूचित जमाती संवर्गातील २९ गटांवर विशेष लक्ष केंद्रित करून त्याची जबाबदारी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यासाठी पुढील काही दिवस आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा नाशिकलाच मुक्काम ठोकणार आहेत. एकीकडे हे केले जात असतानाच दुसरीकडे भाजपाच्या वतीने ७३ गटांचे तसेच २९ अनुसूचित जमाती संवर्गातील गटांचे सर्वेक्षणही करण्यात आल्याचे कळते. या सर्वेक्षणानुसार अनुसूचित जमाती संवर्गातील २९ पैकी नऊ जागा ए-प्लस (विजय निश्चित), १४ जागा ए (विजयाच्या समीप), ५ जागा बी (विजयासाठी संघर्ष) आणि २ जागा (विजय अनिश्चित) अशी वर्गवारी करण्यात आल्याचे कळते. त्यामुळे आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांना या ए, बी व सी संवर्गातील जागांवर जरा जास्तीच मेहनत घ्यावी लागण्याची चिन्हे आहेत.