९ रिश्टरचा भुकंप पचवू शकते संसदेची नवीन वास्तू
By अझहर शेख | Published: June 22, 2023 02:12 PM2023-06-22T14:12:33+5:302023-06-22T14:15:39+5:30
बांधकामात योगदान देणारे टाटाचे अभियंता संदीप नवलखे यांनी उलगडला पट
अझहर शेख, नाशिक : भारतीय संसदेच्या नवीन वास्तूच्या निर्मिती करताना भुकंपाचा पाचवा झोनची तीव्रता लक्षात घेण्यात आली आहे. यानुसार भुकंपरोधक यंत्रणा विकसित करत बांधकाम करण्यात आले. अत्यंत उच्च प्रतीचा स्टील जो बाजारात उपलब्ध होत नाही, तो या वास्तूच्या बांधकामात वापरला गेला आहे. यामुळे सुमारे ९ रिश्टर स्केलचा धक्कादेखील ही पर्यावरणपूरक आणि प्लॅटिनम-रेटेड ग्रीन वास्तू पचवू शकते, असा विश्वास संसदेची वास्तु उभारणी करणारे टाटा प्रकल्पाचे कार्यकारी उपाध्यक्ष अभियंता संदीप नवलखे यांनी व्यक्त केला.
गंगापुररोडवरील के.बी.टी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथे फायर सिक्युरिटी असो.ऑफ इंडियाच्या (एफएसएआय) वतीने ‘नवीन संसदेचे बांधकाम : एक अभियांत्रिकी दृष्टीकोन’ या कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी (दि.२१) करण्यात आले होते. यावेळी ते म्हणाले, नवीन संसदेची वास्तू उभारणी आव्हानात्मक होती. दिल्ली शहराचा समावेश हा भुकंपाच्या ४थ्या झोनमध्ये होतो; मात्र तरीही पाचव्या झोनमधील तीव्रता विचारात घेत भुकंपरोधक बांधकाम करण्यात आले आहे. या वास्तूचे आर्युमान साधारणत: दीडशे वर्षे इतके सहज आहे, असा दावाही नवलखे यांनी यावेळी केला. संसद भवनात भारतातील प्रचलित असलेल्या लोकप्रिय स्थापत्य शैलींची संस्कृती आणि शिल्पकला प्रदर्शित करण्यात आली आहे. देशाची सर्वोच्च वास्तू उभारणीत योगदान दिल्याचा अभिमान वाटतो, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी एफएसएआय नाशिकचे अध्यक्ष वरुण तीवारी, सचिव हर्षद भामरे उपस्थित होते.
एक भारत श्रेष्ठ भारत...
संसदेची नवीन वास्तू उभारणी करताना ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ यानुसार कामांची विभागणी करण्यात आली आहे. समग्र देशाचा या संसद भवनात सहभाग हवा या हेतूने देशाच्या कानाकोपऱ्यातून साहित्य मागविण्यात आले आहे. अगदी बांबूपासून ते दगडी कोरीव कामापर्यंत प्रत्येक गोष्ट ही वैशिष्ट्यपुर्ण व वैविध्यपुर्ण असल्याचे नवलखे यांनी सांगितले.
कुठल्या शहरातून काय आणले...
- मुंबई- फर्निचर उभारणी
- त्रिपुरा- बांबू
- उत्तरप्रदेश- गालिचे
- सरमथुरा- लाल-पांढरे वाळुुंचे दगड,
- उदयपूर- केशरी- हिरवा दगड, र्
- लाखा (अजमेर)- लाल ग्रेनाईट,
- अंबाजी- पांढरे संगमरवर दगड
- इंदुर- अशोक चक्र
- नागपुर- उच्च प्रतीचा साग लाकूड
खर्च - १ हजार कोटी
- २६,०४५ मेट्रिक टन स्टीलचा वापर
- ६३,८०७ मेट्रिक टन सिमेंटचा वापर
- ९६८९ घनमीटर फ्लाय अॅशचा वापर