नऊ वर्षाच्या मुलीला डेंग्यू
By admin | Published: November 28, 2015 11:05 PM2015-11-28T23:05:20+5:302015-11-28T23:06:05+5:30
न्यायडोंगरी : आरोग्य यंत्रणा सतर्क
न्यायडोंगरी : न्यायडोंगरी गावात डेंग्यूचा रुग्ण आढळून आला आहे. आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून उपाय योजनेची जोरदार मोहीम हाती घेतली आहे. ग्रामपालिकेने वराती मागून घोडे याप्रमाणे डास प्रतिबंध फवारणी सुरू केली आहे.
न्यायडोंगरी येथील प्रभाग क्रमांक तीन मध्ये राहणाऱ्या व इयत्ता तिसरीत शिकत असलेल्या ९ वर्षीय मुलीस ताप, सर्दी, हातपाय दुखणे हा त्रास जाणवू लागल्याने चाळीसगाव येथील बालरोग तज्ज्ञ डॉ. शशिकांत राणा यांच्याकडे दाखल केले असता प्रयोगशाळेतून रक्त नमुन्यासह विविध चाचण्यांचा अहवाल प्राप्त होताच त्यात ‘डेंग्यू’ एन. एस.१ (पॉझिटिव्ह) आल्याने तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहे.
न्यायडोंगरी येथील शासकीय आरोग्य विभागाने याची गंभीर दखल घेत जनजागृती सह प्रतिबंधक उपाय याची माहिती देण्याचे काम कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात येत आहे.
आरोग्य विभागाकडून कानपिचक्या मिळाल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासन जागे झाले असून पाणी शुद्धिकरण, गटार स्वच्छता डास निर्मूलन, फवारणी, गटारीवर पावडर टाकणे आदि कामे सुरू केली आहे.