मालेगावच्या पाणीपुरवठा योजनांसाठी ९० कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:11 AM2021-07-08T04:11:41+5:302021-07-08T04:11:41+5:30
मालेगाव : तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांसाठी ९० कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी मिळाली असल्याची माहिती कृषिमंत्री ...
मालेगाव : तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांसाठी ९० कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी मिळाली असल्याची माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली. १२ गा. योजनेतील गावांसाठी ४४ कोटींच्या आराखड्यास मंजुरी मिळाली आहे. यामध्ये तीन एमएलडी क्षमतेचे अतिरिक्त जलशुद्धीकरण केंद्र उभारणे तसेच तळवाडे, बेळगाव, ढवळेश्वर या ठिकाणांच्या वितरण जलकुंभापर्यंत रायझिंग मेन पाइपलाइन करणे, तसेच १२ गा. योजनेतील गावांसाठी गावअंतर्गत पाइपलाइन करणे व आवश्यकता असलेल्या गावांना अतिरिक्त जलकुंभ उभारणे आदी कामे केली जाणार आहेत. जिल्हा परिषद यंत्रणेअंतर्गत सामुदायिक योजनेव्यतिरिक्त अजंग, आघार बु., चिचवे गा., दाभाडी, ढवळेश्वर (मित्रनगर), डाबली, दुंधे, गाळणे, गारेगाव, गरबड, कजवाडे, कंधाणे, काष्टी, खडकी, कुकाणे, कंक्राळे, कोठरे बु., कोठरे खु., खाकुर्डी, लुल्ले, लेंडाणे, निळगव्हाण, निमशेवडी, नागझरी, नांदगाव खु., मोरदर, टिपे १ व २, पोहाणे, रावळगाव, रामपुरा, सातमाने, सावतावाडी, वडगाव, वजीरखेडे, वळवाडे, वळवाडी, वडेल, वडनेर, झोडगे या ३९ गावांना पाणीपुरवठा योजनेअंतर्गत स्रोत बळकटीकरण, पाइपलाइन दुरुस्ती व नवीन योजनांसाठी ३३ कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी मिळाली आहे.
------------------------
अंदाजपत्रके लवकरच शासनाकडे
तालुक्यातील २६ गाव पाणीपुरवठा योजनेसाठी पाइप बदलणे, पंप बदलणे, गावअंतर्गत पाइपलाइन, फिल्टर प्लांट दुरुस्ती यासह अन्य कामांसाठी अंदाजे ११ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. २५ गाव माळमाथा योजनेतील गावांसाठी धरणाची उंची वाढविणे, गावअंतर्गत पाइपलाइन करणे, नळ कनेक्शन देणे या व अन्य कामांसाठी साधारण २.५० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या योजनेतील कामांची अंदाजपत्रके तयार करून लवकरच शासनास सादर करण्यात येणार असल्याचे भुसे यांनी सांगितले.