नाशिकमधील ९०७ गावे दाखविणार एकजूट: ‘एक गाव एक गणपती’ धुमधडाक्यात होणार गणेशोत्सव साजरा
By अझहर शेख | Published: August 31, 2022 03:12 PM2022-08-31T15:12:47+5:302022-08-31T15:13:40+5:30
जिल्ह्यात तालुकापातळीवरील तब्बल ९०७ गावांमधील गावकऱ्यांनी एकत्र येत एकजुटीने गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
नाशिक :
जिल्ह्यात तालुकापातळीवरील तब्बल ९०७ गावांमधील गावकऱ्यांनी एकत्र येत एकजुटीने गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. ९०७ गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’ याप्रमाणे गणरायाचा उत्सव रंगलेला पहावयास मिळणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिली आहे. या पार्श्वभुमीवर प्रत्येक तालुकानिहाय व पोलीस ठाणेनिहाय बैठका घेतल्या गेल्या आहेत. गणेशोत्सवाला कोठेही कुठल्याही स्वरुपाचे गालबोट लागू नये, यासाठी ग्रामीण पोलीस दल सतर्क असल्याचे अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले.
‘गाव करी ते राव काय करी...’ या म्हणीनुसार गावाची एकजुटीपुढे सर्व काही फिके असते. यामुळे गणेशोत्सवकाळात तब्बल ९०७ गावांमध्ये‘आपले गाव एक तर आपला गणपतीसुद्धा एक’ अशी भूमिका घेत सार्वजनिक गणेशोत्सव आनंदात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या लाटेपुर्वी २०१९साली सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या तब्बल दीड हजार मंडळांनी जिल्हाभरातून नोंदणी केली होती यावर्षीही मंडळांची संख्या वाढलेली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना पोलिसांकडून गाव, पंचक्रोशीच्या पातळीवर स्थानिक पोलीस ठाण्याच्या मदतीने ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यावर भर दिला जात आहे. त्यानुसार पोलिस ठाणेनिहाय बैठका घेण्यात आल्या आहेत.
त्यामुळे गावकऱ्यांमधील संवाद, एकोपा, परस्परसंबंधही अधिकाधिक वृद्धींगत होण्यास मदत मिळणार आहे. कोरोनामुळे सामाजिक संबंधांमध्ये आलेली मरगळ यानिमित्ताने कुठेतरी कमी होईल आणि गावांमधील सामाजिक भावना, बंधुभाव अधिकाकधिक वाढीस लागेल, असा आशावाद पाटील यांनी व्यक्त केला आहे.