३६३ नागरिकांकडून ९२ हजारांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 12:52 AM2021-03-30T00:52:29+5:302021-03-30T00:54:17+5:30
नाशिक : शहर व परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिकाधिक वाढू लागल्यामुळे निर्बंधांची कठोरपणे अंमलजबावणी केली जात आहे. शहर पोलीस आयुक्तालयातील ...
नाशिक : शहर व परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिकाधिक वाढू लागल्यामुळे निर्बंधांची कठोरपणे अंमलजबावणी केली जात आहे. शहर पोलीस आयुक्तालयातील सर्वच पोलीस ठाण्यांचे अधिकारी, कर्मचारी आता ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहेत. रविवारी (दि.२८) रात्री उशिरापर्यंत चाललेल्या कारवाईमध्ये मास्कविना वावरणाऱ्या ३६३ बेफिकिरांवर दंडात्मक कारवाई केली. तब्बल ९१ हजार ९०० रुपयांचा दंड एका दिवसात पोलिसांनी वसूल केला.
राज्य सरकारने सर्व अस्थापना मेडिकलचा अपवाद वगळता, सर्व शहरांमध्ये रात्री आठ वाजता बंद करण्याचा आदेश रविवारी जारी केला आहे. त्याचप्रमाणे, मास्कचा कटाक्षाने वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे, तरीही शहरात बहुतांश भागामध्ये निष्काळजीपणे मास्कविना वावरणाऱ्यांचीही संख्या कमी नाही. यामुळे अशा लोकांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी दिले आहे. त्याचप्रमाणे, निर्बंधांचा भंग करणाऱ्या अस्थापनांच्या चालकांवरही दंडात्मक कारवाई केली जात आहे. ग्राहकांची गर्दी होणार नाही, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून दुकानांपुढे योग्य त्या अंतरावर ग्राहकांना उभे राहण्यासाठी सांकेतिक खूण म्हणनू पांढऱ्या रंगाने वर्तुळ अथव चौकोने आखून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
n नागरिकांची गर्दी होणार नाही आणि सामाजिक अंतर राखण्यास मदत होईल या हेतुने कारवाई केली जात आहे. मात्र, अद्यापही बहुतांश व्यावसायिकांनी या
अंमलबजावणी करण्याबाबत उदासीनता दर्शविलेली दिसून येते.
n ज्या व्यावसायिकांनी नियमांचे पालन करण्यास कचुराई केल्याचे दिसून आले अशा एकूण दहा अस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. अस्थापनाचालकांकडून एकूण ३६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
n सामाजिक अंतराचे उल्लंघन करणाऱ्या चार इसमांवर कारवाई करत, प्रत्येकी एक हजार रुपयेप्रमाणे चार हजारांचा दंड करण्यात आला.