पोर्टेबिलिटी सुविधाद्वारे ९४ लाख ५६ हजार शिधापत्रिकाधारकांनी घेतला लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:15 AM2021-04-20T04:15:08+5:302021-04-20T04:15:08+5:30
नाशिक : केंद्र शासनाच्या ‘एक देश एक रेशन कार्ड’ या योजनेंतर्गत संबंधित रेशन दुकानात आधार प्रमाणिकरण करुन लाभार्थ्याला पोर्टेबिलिटीद्वारे ...
नाशिक : केंद्र शासनाच्या ‘एक देश एक रेशन कार्ड’ या योजनेंतर्गत संबंधित रेशन दुकानात आधार
प्रमाणिकरण करुन लाभार्थ्याला पोर्टेबिलिटीद्वारे देशातील कोणत्याही राज्यातून तसेच
राज्यातील कोणत्याही जिल्हयातून धान्य घेण्याची सोय उपलब्ध आहे. लॉकडाऊन झाल्यानंतर गेल्या वर्षी १ एप्रिल ते चालू वर्षी मार्चपर्यंत या वर्षभराच्या कालावधीत जिल्हांतर्गत पोर्टेबिलिटी सुविधेचा ९४ लाख ५६
हजार शिधापत्रिकाधारकांनी लाभ घेतला आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी
अरविंद नरसीकर यांनी दिली.
गेल्या वर्षी अचानक लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर परप्रांतीय मजुरांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले होते. रोजगाराची साधने बंद असल्याने हा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यावेळी केंद्र शासनाने
‘एक देश एक रेशन कार्ड’ योजना राबविली होती. यंदा या योजनेंतर्गत राज्यात दरमहा सात लाख शिधापत्रिकांवर जिल्हांतर्गत पोर्टेबिलिटीचा वापर करुन लाभधारक धान्य घेत आहेत. राज्यासह केंद्रशासित प्रदेशातील कोणताही एन. एफ. एस. ए.
कार्डधारक बायोमेट्रिक आधार प्रमाणित करून कोणत्याही राज्यातून धान्य घेऊ शकतो. या
योजनेंतर्गत १५ एप्रिल २०२१ पर्यंत महाराष्ट्रातील ६ हजार ३२० शिधापत्रिकांवरील
लाभार्थ्यांनी बाहेरील राज्यांमधून धान्य घेतले आहे.
इन्फो...
जिल्ह्यातील रास्तभाव दुकानांतून कामगार, ऊसतोड, मजूर, आदिवासी आदी स्थलांतर
करणाऱ्या लाभार्थ्यांना त्यांच्या स्थलांतरणाच्या ठिकाणी कोणत्याही रास्तभाव दुकानांत त्यांना
मंजूर असलेले धान्य प्राप्त करुन घेण्याची सुविधा पोर्टेबिलिटीद्वारे ई-पॉस उपकरणांवर उपलब्ध
करुन देण्यात आली आहे, या वर्गालाच या सुविधेचा लाभ अधिक मिळाला आहे.