नाशकात 948 कोरोनाचे नवे रुग्ण; 5 जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 08:21 PM2020-08-28T20:21:05+5:302020-08-28T20:21:47+5:30
जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येसोबत दगावणाऱ्या रुग्णांचेप्रमाण शुक्रवारी कमी झाल्याने तितकाच दिलासा मिळाला.
नाशिक : जिल्हयातील कोरोनाची रुग्णसंख्या आता 34 हजार 46 इतकी झाली आहे. शुक्रवारी (दि.28) नव्याने 948 रुग्ण आढळून आले. सर्वाधिक 742 रुग्ण केवळ नाशिक शहरात मिळून आले असून उपचारार्थ दाखल 5 रुग्ण दगावले. मागील दोन दिवसांच्या तुलनेत शुक्रवारी मृतांचा आकडा कमी होण्यास मदत झाली. जिल्ह्यात दिवसभरात 741रुग्णांनी कोरोनावर मात केली.
मागील चार दिवसांपूर्वी कोरोनाबधित रुग्णांचा आकडा घसरला होता; मात्र अचानकपणे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. गुरुवारी कोरोनाबधित रुग्णांचा जिल्हयाचा आकडा थेट 1हजाराच्यापुढे सरकला होता. तसेच शुक्रवारीसुध्दा 948 रुग्ण मिळून आले. दिवसभरात जिल्हयात 1हजार 252 संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक 947 रुग्ण शहरातील आहेत. एकूणच शहरवासीयांकरिता कोरोना संक्रमणाचा धोका अधिकच वाढला आहे.. नाशिक ग्रामीणच्या तुलनेत शहरात स्थिती अधिक भयावह होत चालली आहे.
जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येसोबत दगावणाऱ्या रुग्णांचेप्रमाण शुक्रवारी कमी झाल्याने तितकाच दिलासा मिळाला. गुरुवारी सर्वाधिक 21 रुग्ण मृत्युमुखी पडले होते. सध्या जिल्हयात आतापर्यंत 27 हजार 337 रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. तसेच 5 हजार 870 रुग्ण उपचार घेत आहेत. 88 हजार 595 लोकांचे नमुना चाचणी अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. नाशिककरांना अधिकाधिक खबरदारी घेत शासनाने सांगितलेल्या उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे. सध्याचा काळ सण-उत्सवांचा असल्याने संक्रमणाचा धोका अधिक वाढला आहे.