कळवण तालुक्यात ९५ गावात ‘एक गाव, एक गणपती’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 05:30 PM2018-09-13T17:30:12+5:302018-09-13T17:33:06+5:30
कळवण तालुक्यात ‘एक गाव एक गणपती’ या संकल्पनेनुसार ९५ गावात गुरुवारी श्री गणरायाची उत्साहात स्थापना करण्यात आली . स्थापनेपूर्वी कळवण शहरात तसेच अभोणा ,कनाशी तसेच आदीवासी भागातील मंडळानी जोरदार मिरवणुका काढून गणरायाची विधीवत स्थापना केली. शहर व तालुक्यात बहुतांशी ठिकाणी घरोघरी गणेश भक्तांनी गणरायाची स्थापना केली.
ढोल, ताशे अन् बाल गोपाळांच्या गुलालाची उधळण करीत गुरुवारी विघ्नहर्त्याचे जल्लोषात आगमन झाले. त्यासाठी कळवणची श्री विठ्ठल नगरी सज्ज झाली होती. शहरातील मेनरोड व बाजारपेठेतही उत्साहाचे वातावरण पसरले होते. सकाळपासूनच गणेश मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची तसेच घरोघरी बाप्पांच्या स्वागताच्या जय्यत तयारीला सुरु वात झाली होती. आॅनलाईन पध्दतीने गणेश मंडळानी परवानगीसाठी फार्म भरले असून यंदा गणेशमंडळाची नाल बंद होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कळवण तालुक्यातील मार्कंडपिंप्री, मळगाव ,कातळगाव, मोहनदरी, धनेर, भैताने, आठंबे ,पाळे पिंप्री, निवाणे, चाचेर, बगडू, जिरवाडे, पाटविहीर, शिरसमनी, बगडू , निवाणे आदी तालुक्यातील ९५ गावामध्ये एक गाव एक गणपतीची स्थापना करण्यात आली आहे . कळवण शहरात २५ तर ग्रामीण भागात १५ मोठ्या मंडळानी गणरायाची स्थापना केली आहे. शहरात २० तर ग्रामीण भागात १४ लहान मंडळानी स्थापना केली असून ३० गावात ‘एक गाव एक गणपती’ची स्थापना केली आहे. अभोणा पोलीस स्टेशन हद्दीत ४५ मंडळ तर ६५ गावात ‘एक गाव एक गणपती’ची स्थापना करण्यात आली आहे.
पोलीस स्टेशन हद्दीत गणेशोत्सव शांततेत पार पडण्यासाठी उपद्रवी प्रवृत्तीच्या लोकांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेचा भंग करुन गोंधळ घालणाऱ्या उपद्रवींवर कडक कारवाई केली जाणार आहे.
- सुधाकर मांडवकर , पोलिस स्टेशन, कळवण
कळवण तालुक्यात गणेश उत्सव काळात भारनियमन होणार नसून गणेश मंडळांनी अधिकृतपणे वीज पुरवठा घेऊन वीज वितरण कंपनीला सहकार्य करावे. अनधिकृतपणे वीजेचा वापर आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल.
- ऋषीकेश खैरनार
उपकार्यकारी अभियंता