नाशकात आठवडाभरातच ९६ जणांना डेंग्यूचा डंख

By Suyog.joshi | Published: July 9, 2024 10:55 AM2024-07-09T10:55:41+5:302024-07-09T10:55:52+5:30

आदिवासी आयुक्तालय व महिला आयटीआयला याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे.

96 people were bitten by dengue within a week in Nashik | नाशकात आठवडाभरातच ९६ जणांना डेंग्यूचा डंख

नाशकात आठवडाभरातच ९६ जणांना डेंग्यूचा डंख

नाशिक (सुयोग जोशी) : गेल्या काही दिवसांपासून शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत असून, जुलैच्या पहिल्याच आठवड्यात शहरात ९६ डेंग्यूचे रुग्ण सापडले आहेत. महापालिकेच्या मलेरिया विभागाकडून ३०८ संशयितांची तपासणी करण्यात आली होती. सुदैवाने डेंग्यूमुळे कोणाचा बळी गेला नसला तरी पावसाळ्याच्या प्रारंभीच परिस्थिती हाताबाहेर गेल्याने आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. त्यांच्याकडून डेंग्यू उत्पत्तिस्थळांचा शोध घेतला जात असून, आदिवासी आयुक्तालय व महिला आयटीआयला याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे.


जागतिक आरोग्य संघटनेने जगभरात यंदा डेंग्यू डासांचे प्रमाण वाढणार असून, रुग्णसंख्याही वाढेल असा धोक्याचा इशारा दिला. तो खरा ठरत असून, शहरात जुलैमध्ये डेंग्यू रुग्णसंख्या हाताबाहेर गेली आहे. मागील जून महिन्यात १५५ डेंग्यू पाॅझिटिव्ह रुग्ण सापडले होते. मात्र, चालू जुलैच्या पहिल्या आठवड्यात ३०८ संशयितांपैकी पाॅझिटिव्ह रुग्णांचा आकडा ९६ पर्यंत पोहोचला. त्यामुळे आरोग्य विभाग खडबडून जागा झाला असून, शहरात सर्व विभागात भेटी देऊन डेंग्यू उत्पत्तिस्थळे शोधली जात आहेत. सर्वत्र धूर व औषध फवारणी सुरू आहे. मागील आठवड्यात केंद्राचे मलेरिया विभागाचे पथक शहरात येऊन गेले. त्यांनी डेंग्यूचे उत्पत्तिस्थळे तत्काळ नष्ट करा व उपाययोजना राबवा अशी तंबी दिली. त्यानंतर मनपा आरोग्य विभाग घरोघरी भेटी देत आहे. तसेच बांधकाम प्रकल्प, शासकीय कार्यालये व जे ठिकाण डेंग्यूचे हाॅटस्पाॅट ठरू शकतात त्यांना नोटिसा बजावत आहे. मागील सहा महिन्यांत डेंग्यू उत्पत्तिस्थळे आढळल्याप्रकरणी ५४ हजारांचा दंड आकारला आहे.
 
विभागनिहाय रुग्ण आकडेवारी
सातपूर - २
सिडको - ३८
नाशिक पूर्व - १५
नाशिकरोड - २१
नाशिक पश्चिम १०
पंचवटी - १०
 
शहरात महापालिकेच्या वतीने नियमित धूरफवारणी केली जात आहे. मागील आठवड्यात ९६ डेंग्यू पाॅझिटिव्ह रुग्ण सापडले. मलेरिया विभागाकडून धूर व औषध फवारणी, डेंग्यू उत्पत्तिस्थळे शोधणे व घरोघरी भेटी देणे सुरू असून, दंडात्मक कारवाई केली जात आहे. शासकीय कार्यालयांचीही तपासणी केली जात आहे.

-- डाॅ. नितीन रावते, जीवशास्त्रज्ञ, मलेरिया विभाग मनपा

Web Title: 96 people were bitten by dengue within a week in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक