बागलाण तालुक्यात कोरोनाचे आठ दिवसात ९६० रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:15 AM2021-04-01T04:15:34+5:302021-04-01T04:15:34+5:30
तालुक्यात दररोज सरासरी ८० बाधित रुग्ण आढळत असून यात सर्वाधिक प्रमाण सटाणा शहराचे आहे. सुरू असलेल्या शाळा, बस, प्रवासी ...
तालुक्यात दररोज सरासरी ८० बाधित रुग्ण आढळत असून यात सर्वाधिक प्रमाण सटाणा शहराचे आहे. सुरू असलेल्या शाळा, बस, प्रवासी वाहतूक, लग्न, अंत्ययात्रा याठिकाणी होत असलेल्या गर्दीचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. या आठ दिवसात शहरातील कोरोना बाधितांची संख्या अडीचशेवर गेली आहे. भाक्षी रोड,नामपूर रोड, पिंपळेश्वर रोड या परिसरातील रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. शहरापाठोपाठ लखमापूर, ब्राह्मणगाव ,नामपूर, ताहाराबाद, जायखेडा, मुल्हेर, कोटबेल , बिजोरसे,टेंभे ,ठेंगोडा ,चौंधाणे, अंतापूर ,बिजोटे ,कुपखेडा ,द्याने ,उत्राणे ,दरेगाव , आसखेडा ,सोमपुर या गावांमध्येदेखील झपाट्याने रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. तालुक्यात आठ दिवसातच बाधितांची संख्या हजारी पार झाली असून तब्बल ९६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, कोरोनाने तीन दिवसात चार जणांचा बळी घेतला असून त्यामध्ये ठेंगोडा,मळगाव आणि आनंदपूर येथील रुग्णांचा समावेश आहे.
बाधित रुग्णांची हेळसांड ......
बागलाण तालुक्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्ण संख्या विचारात घेता रुग्ण सुविधा अपुऱ्या असल्याची ओरड आहे. तालुक्यात डांगसौंदणे येथे ३८ बेडचे कोविड हॉस्पिटल आहे. प्रत्येक बेडला ऑक्सिजनची सुविधा आहे तर शहरातील नामपूर रस्त्यावरील शासकीय वसतिगृहात कोविड केअर सेंटर उभारण्यात आले असून त्याठिकाणी २०० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे; मात्र रुग्ण संख्या पाहता मोसम पट्ट्यातील रुग्णांसाठी स्वतंत्र कोविड हॉस्पिटल व केअर सेंटर उभारण्याची मागणी आमदार दिलीप बोरसे यांनी पालकमंत्री छगन भुजबळ,जिल्हाधिकारी सूरज मांढरे ,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांच्याकडे केली आहे. तसेच ऑक्सिजन बेडची संख्या अत्यंत कमी असून ती दोनशेवर नेण्याची मागणीही त्यांनी केली आहे.