मनपाकडून ९८ टक्के तक्रारींचे निवारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 01:10 AM2018-09-27T01:10:43+5:302018-09-27T01:11:00+5:30
सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी महापालिकेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या ई-कनेक्ट अॅपला मोठा प्रतिसाद मिळत असून, प्रशासन तक्रारींचे निराकरणही करीत आहेत. या अॅपवरून प्राप्त झालेल्या तक्रारींपैकी ९८.२५ टक्के इतक्या तक्रारींचे निवारण करण्यात आले आहेत.
नाशिक : सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी महापालिकेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या ई-कनेक्ट अॅपला मोठा प्रतिसाद मिळत असून, प्रशासन तक्रारींचे निराकरणही करीत आहेत. या अॅपवरून प्राप्त झालेल्या तक्रारींपैकी ९८.२५ टक्के इतक्या तक्रारींचे निवारण करण्यात आले आहेत. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापालिकेच्या जुन्या अॅपचे नूतनीकरण करून त्यात अनेक सुविधा दिल्या आहेत. कोणत्याही तक्रारीसाठी नागरिकांना महापालिकेत येण्याची वेळ येऊ नये यासाठी या अॅपची व्यवस्था आहे. विशेष म्हणजे तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने चोवीस तासात ती तक्रार ओपन केली नाही तर त्याला अॅटो जनरेटेड मेमो बजावला जात असल्याने अधिकाºयांनी खूप गांभीर्याने घेतले आहे. इतकेच नव्हे तर खाते प्रमुखांनादेखील तक्रारींचे निराकरण न झाल्यास जबाबदार धरून चौकशी केली जात असल्याने तक्रार करताच सत्वर कारवाई केली जाते.
प्रशासनाकडे आत्तापर्यंत २२ हजार ७६८ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील २२ हजार ३७० तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. म्हणजेच ९८.२५ टक्के इतक्या तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. प्रशासकीय कामकाजात सुधारणा करण्यासाठी महापालिकेने ही सुविधा उपलब्ध करून दिली असून, नागरिकांनादेखील तक्रार निराकरणाचा सुखद अनुभव येत आहे.
आता ४३ सेवा आॅनलाइन
महापालिकेने विविध प्रकारचे दाखले आणि परवानग्यांसाठी आता आॅनलाइन व्यवस्था केली असून, त्यानुसार ४३ प्रकारच्या परवानग्या दिल्या जात आहेत. आॅनलाइन कागदपत्रे पाठविणे आणि तसेच पेमेंट करून ही सुविधा दिली जात असून, नुकताच या सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे.
नागरिक म्हणतात
सेवा चांगलीच
महापालिकेच्या या अॅपवर रेटिंगचीदेखील सुविधा असून, त्यानुसार महापालिकेला चांगली सेवा दिल्याचा अभिप्राय महापालिकेने नोंदविला आहे. एखादी तक्रार नोंदविल्यानंतर तिच्या निराकरणानंतर नागरिकांना काय वाटते याबाबत क्रमवारीची सुविधा देण्यात आली आहे.