दुष्काळी गावांतही जगली ९८ टक्के रोपे
By admin | Published: January 28, 2017 01:10 AM2017-01-28T01:10:16+5:302017-01-28T01:10:28+5:30
वृक्षलागवड अभियान : पर्जन्यराजाची वृक्षारोपणावर कृपा
नाशिक : राज्य शासनाच्या वतीने
१ जुलै २०१६ रोजी दोन कोटी वृक्षलागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राज्यभर राबविण्यात आला. नाशिक जिल्ह्यातही वनविभागासह इतर सर्व शासकीय कार्यालयाच्या वतीने सदर मोहीम राबविण्यात आली. परंतु यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग हा वनविभागाचा होता. या उपक्रमांतर्गत वनविभागाने मागीलवर्षी केलेल्या वृक्षारोपणाचा आढावा घेतला असता ६२ गावांमध्ये करण्यात आलेल्या वृक्षारोपणातील सुमारे ९८ टक्के वृक्ष जिवंत असल्याचे सर्वेक्षणांतर्गत समोर आले आहे. विशेष म्हणजे ९० टक्के गावे ही दुष्काळी आहेत.
वनविभागाच्या वतीने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून राज्यभर दोन कोटी वृक्षलागवड करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम गेल्या १ जुलै २०१६ रोजी राबविण्यात आला. यामध्ये शासनाच्या सर्व खात्यांनी सहभाग नोंदविला होता. वनविभागाच्या पूर्व विभागात सात दुष्काळी तालुक्यांतील ६२ गावांमध्ये वृक्षारोपण करण्याचे आणि लावलेली रोपे जगविण्याचे शिवधनुष्य वनविभागाने पेलले आहे. नियोजन, निगराणी आणि नियमावलीच्या त्रिसूत्रीतून वृक्षारोपणाचे संगोपन करण्यात आल्याने रोपांना संजीवनी मिळाली आहे.
इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सिन्नर, नाशिक, सुरगाणा आणि दिंडोरी यासारख्या आदिवासी आणि दुष्काळी भागातील दुर्गम क्षेत्रात वनविभागाने व्यापक वृक्षारोपण मोहीम राबविली होती. या मोहिमेत वनविभागाने ९ लाख ३७ हजार ७९ वृक्षांची लागवड केली होती. त्यामध्ये ९ लाख २५ हजार ९५१ इतकी रोपे जगल्याच्या माहितीची नोंद करण्यात आली आहे. रोपे जगण्याची ही टक्केवारी ९८.८० टक्के इतकी आहे. तर याच तालुक्यांमध्ये संयुक्त वनव्यवस्थापन समितीने लागवड केलेल्या ९ लाख ४५ हजार ७९ रोपांपैकी ९ लाख ३३ हजार ६२५ इतकी रोपे जगल्याची गणना करण्यात आलेली आहे. रोपे जगण्याची ही टक्केवारी ९८.७९ टक्के इतकी आहे. (प्रतिनिधी)