शिवजयंतीची गर्दी, भावाने बोलावलं पण गेला नाही अन्...; तरुणाच्या हत्येने नाशिकमध्ये खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 15:16 IST2025-02-21T15:16:17+5:302025-02-21T15:16:54+5:30

काही नागरिकांना मोकळ्या जागेत एक युतक नीपचित पडलेला दिसला. यामुळे पोलिसांना माहिती कळवण्यात आली.

A 25 year old young man was stoned to death in sinnar | शिवजयंतीची गर्दी, भावाने बोलावलं पण गेला नाही अन्...; तरुणाच्या हत्येने नाशिकमध्ये खळबळ

शिवजयंतीची गर्दी, भावाने बोलावलं पण गेला नाही अन्...; तरुणाच्या हत्येने नाशिकमध्ये खळबळ

Nashik Crime: जुन्या भांडणाची कुरापत काढून टोळक्याने सिन्नर फाटा येथील अजय शंकर भंडारी या २५ वर्षीय याचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली. नवले कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यापासून पुढे काही मीटर अंतरावर आयएसपी प्रेसच्या भूखंडावर अजयचा मृतदेह नागरिकांना आढळला. अवघ्या चार तासांत नाशिक रोड पोलिसांनी या खुनाची उकल करत चौघांना ताब्यात घेतले. यामध्ये तिघेही अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सिन्नर फाटा विष्णूनगर येथील अजय हा रेल्वे पार्किंग येथे हमालीसह अन्य मोलमजुरीची कामे करत होता. त्याचा मोठा भाऊ अक्षय व अजय हे आपल्या मित्रांसोबत बुधवारी सायंकाळी शिवाजी पुतळा येथे मिरवणुकीसाठी आले होते. रात्री अकरा वाजेच्या सुमारास अक्षय हा घरी गेला. अजय हा रेल्वे पार्किंग येथे रात्री काम करत असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याची वाट बघितली नाही व सर्वजण झोपी गेले. उड्डाणपुलाजवळून नवले कॉलनीमध्ये जाणाऱ्या रस्त्यावर एक दुचाकी (एम.एच.१५ जीवाय ८०५७) बेवारसपणे उभी होती व किल्लीदेखील गाडीला लावलेली आढळून आली. तसेच काही नागरिकांना मोकळ्या जागेत एक युतक नीपचित पडलेला दिसला. यामुळे पोलिसांना माहिती कळविण्यात आली. माहिती मिळताच पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त डॉ. सचिन बारी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तेथे अजयच्या डोक्यात दगड टाकून ठार मारण्यात आल्याचे निष्पन्न झाले.

...तर अजयचे प्राण वाचले असते
अजयचा मोठा भाऊ अक्षय याने रात्री त्याला मोबाइलवर फोन करून गाडीचे पेट्रोल संपले आहे, पेट्रोल घेऊन ये असे सांगितले. त्यानंतर काही वेळाने अजय पेट्रोल घेऊन आला. मात्र शिवजयंतीच्या गर्दीमुळे अजयने गाडी दुसरीकडे पार्किंग केल्याने त्यांना दुचाकीत पेट्रोल टाकणे शक्य झाले नाही. अक्षयने भाऊ अजयला तू चल घरी, गाडी येथेच राहू दे, असे सांगितले; मात्र अजयने अक्षयसोबत जाण्यास नकार दिला. जर अजय हा अक्षयसोबत घरी गेला असता, तर कदाचित त्याचे प्राण वाचू शकले असते, अशी परिसरात चर्चा सुरू होती. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून अजयच्या नातेवाइकांना माहिती दिली. त्याच्या पश्चात आई, भाऊ, बहीण असा परिवार आहे. याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चार तासांत खुनाची उकल
दुय्यम पोलिस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे, विश्वजीत जगताप, सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, उपनिरीक्षक संदीप पवार, अविनाश देवरे, विजय टेमगर, संदीप पवार, विशाल कुवर, समाधान वाजे, नाना पानसरे, अजय देशमुख, रोहित शिंदे यांच्या पथकाने त्वरित परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करत तपासचक्रे फिरविली. यावेळी अजय हा बुधवारी दुपारपासून त्याचा मित्र संशयित तुषार संजय खरे (१८) याच्यासोबत होता. दोघांनी सोबतच मद्यपान केले होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तुषारला ताब्यात घेत चौकशी केली. यावेळी त्याने अन्य तिघांच्या मदतीने दगडांनी अजयला मारहाण करून खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. जुन्या भांडणाची कुरापत काढून या चौघांनी त्याला ठार मारले.

Web Title: A 25 year old young man was stoned to death in sinnar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.