नाशिकच्या २९ वर्षीय जवानाचा राजस्थानमध्ये अपघातात मृत्यू
By अझहर शेख | Published: March 19, 2023 11:05 AM2023-03-19T11:05:02+5:302023-03-19T11:07:37+5:30
ते भारतीय सेनेच्या ५४ अरमाड बटालियनमध्ये कर्तव्यावर होते.
नाशिक : येवला तालुक्यातील जवान अजित गोरख शेळके (२९) यांचा राजस्थानमध्ये श्रीगंगानगर येथे अपघातात मृत्यू झाला. ते भारतीय सेनेच्या ५४ अरमाड बटालियन मध्ये कर्तव्यावर होते.
कर्तव्य आटोपून क्वार्टरकडे परतताना युनिटमध्ये त्यांचा अपघात झाला. यामुळे शेळके यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी रात्री उशिरा उपचारादरम्यान त्यांना डॉक्टरांनी मयत घोषित केले. त्यांचे पार्थिव आज रविवारी रात्रीपर्यंत येवला तालुक्यातील त्यांच्या मूळ मानोरी गावात दाखल होण्याची श्यक्यता असल्याचे नाशिक जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
सोमवारी सकाळपर्यंत त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यविधी होऊ शकतात असे सूत्रांनी सांगितले. त्यांच्या निधनाची बातमी गावात पोहचताच मानोरी बुद्रुक गावासह येवला तालुक्यात शोककळा पसरली आहे. शेळके यांच्या पश्चात वडील पत्नी, भाऊ, वहिनी असा परिवार आहे. सकाळपासूनच त्यांच्या राहत्या घरी नातेवाईक व हितचिंतकांनी सांत्वनासाठी गर्दी केली होती.
भूजबळांकडून शोक
येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुकचे सुपुत्र वीरजवान अजित शेळके हे देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना अपघातात शहीद झाले. त्यांच्या निधनाने तीव्र दुःख झाले. येवला तालुक्यातील ग्रामीण भागातून पुढे येऊन शिक्षण घेत सैन्यदलात भरती झालेले वीरजवान अजित शेळके यांनी सैन्यदलात अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावली. त्यांच्या निधनाने भारत मातेने एक वीर सुपुत्र गमावला आहे. मी व माझे कुटुंबीय शहीद जवान शेळके कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो, असं म्हणत माजी मंत्री छगन भूजबळ यांनी शोक व्यक्त केला.