कुणी घर देता का घर?; दृष्टीहीन दाम्पत्याच्या जगण्याचा संघर्ष थांबेना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 03:36 PM2023-03-23T15:36:10+5:302023-03-23T15:38:24+5:30
खामखेड्याच्या दृष्टिहीन निराधार दाम्पत्याचा संसार उघड्यावर
एकनाथ सावळा
मेशी (जि. नाशिक) : वि. वा. शिरवाडकरांच्या ‘नटसम्राट’ नाटकामधील आप्पासाहेब बेलवलकर यांचे ‘कुणी घर देता का घर’ हे स्वगत म्हणजे प्रत्येक बेघराची शोकांतिका सांगते. जो जास्त आवाज करतो, त्याचीच भाजी विकली जाते, असे म्हणतात; परंतु ज्यांचा काहीच आवाज नसतो, त्यांच्या नशिबी कायम उपेक्षा असते. हीच उपेक्षा देवळा तालुक्यातील खामखेडा येथील दृष्टिहीन वृद्ध दाम्पत्याची सुरू आहे. त्याकडे ना सरकारला पाहायला वेळ ना पुढाऱ्यांना.
देवळा तालुक्यातील खामखेडा येथील आदिवासी वस्तीत वास्तव्यास असणाऱ्या ८५ वर्षीय दगा महारू जाधव आणि ८० वर्षीय बायजाबाई दगा जाधव या दृष्टिहीन वृद्ध दाम्पत्याचे सहा महिन्यांपूर्वी गेल्या पावसाळ्यात मातीचे कौलारू घर कोसळले होते. अगोदरच कोणाचाही आधार नाही. कसे-बसे आयुष्य जगत असताना त्यात राहते घर जमीनदोस्त झाले. त्यामुळे त्यांनी त्याच ठिकाणी उघड्यावर संसार थाटला. प्रशासनाकडून तत्काळ घरकुल मिळेल, अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र, सहा महिने उलटल्यानंतरही घरकुलाचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे ‘कुणी घर देता का घर’ अशी म्हणण्याची वेळ या वृद्ध दाम्पत्यावर आली आहे. सध्या अवकाळी पाऊस, गारपीट झाली. यात हे दाम्पत्य कसेतरी तग धरून वाचले. त्यांना शबरी आवास घरकुल योजनेंतर्गत तत्काळ घरकुल मंजूर करण्यात यावे व दृष्टिहीन दाम्पत्याच्या डोळ्यात पुन्हा जगण्याची उमेद निर्माण करावी, अशी अपेक्षा गावकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यांना लवकरात लवकर घर मिळावे, यासाठी सरपंच आणि ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत; परंतु सरकार दरबारी त्यांच्या प्रयत्नांना यश येताना दिसत नाही. सरपंचांसह ग्रामस्थांनी सहायक जिल्हाधिकारी तथा कळवण प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडे यांना याबाबतचे निवेदनदेखील दिलेले आहे.
आदिवासी दृष्टिहीन वृद्ध दाम्पत्याचे मातीचे कौलारू घर कोसळले होते. यामुळे त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. मात्र, प्रशासनाकडून अद्यापही घरकुलाचा लाभ दिला गेला नसल्याने त्यांचा निवाऱ्याचा प्रश्न सहा महिन्यांनंतरही तसाच आहे. वृद्ध दाम्पत्याला तत्काळ घरकुलाचा लाभ देऊन दिलासा द्यावा, अन्यथा कळवण प्रकल्प कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल. - वैभव पवार, सरपंच, खामखेडा