नाशिकमध्ये महायुतीला धक्का; लोकसभा उमेदवारीसाठी शांतीगिरी महाराजांनी पहिलं पाऊल टाकलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2024 17:18 IST2024-04-26T16:59:29+5:302024-04-26T17:18:22+5:30
शांतिगिरी महाराजांनी नाशिक लोकसभेच्या रिंगणात आपले आव्हान कायम असून ही निवडणूक लढणारच असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

नाशिकमध्ये महायुतीला धक्का; लोकसभा उमेदवारीसाठी शांतीगिरी महाराजांनी पहिलं पाऊल टाकलं!
संकेत शुक्ल, नाशिक : नाशिक जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघातून पहिल्याच दिवशी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. यामध्ये दिंडोरीतून आघाडीतील घटक पक्ष असलेल्या माकपचे जिवा पांडू गावित यांनी अर्ज दाखल केला आहे तर नाशिक मतदारसंघातून शांतिगिरी महाराज यांनीही अर्ज दाखल केला आहे.
शुक्रवार दिनांक २६ एप्रिलपासून लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज विक्रीच्या पहिल्याच दिवशी नाशिकमधून ८७ तर दिंडोरीमधून ४० अर्जांची विक्री झाली आहे. नाशिकमधून शांतिगिरी महाराज यांच्यासह महायुतीचे इच्छुक उमेदवार खासदार हेमंत गोडसे तसेच समता परिषदेच्या दिलीप खैरे यांच्यासाठी अर्ज देण्यात आले आहेत.
नाशिकमध्ये प्रमुख राजकीय पक्षांची उमेदवारी अद्याप फायनल नसतानाच महायुतीसाठी इच्छुक असलेल्या घटकांकडून अर्ज देण्यात येत असल्याने राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. याशिवाय शांतिगिरी महाराजांनी नाशिक लोकसभेच्या रिंगणात आपले आव्हान कायम असून ही निवडणूक लढणारच असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून जे पी गावित यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून इच्छुक म्हणून अर्ज दाखल केल्याने आघाडीतील फूट आता चव्हाट्यावर आली आहे. आघाडीच्या उमेदवारानेच माघार घेऊन आपल्याला पाठिंबा द्यावा असे मत माकपने व्यक्त केल्याने दिंडोरी मतदारसंघातील चुरस आता आणखी वाढली आहे.