वादळाच्या भोवऱ्यात सापडून विहिरीत पडून मुलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2023 04:32 PM2023-04-12T16:32:10+5:302023-04-12T16:32:36+5:30
आजोबांनी विहिरीजवळ येत आरडाओरडा केला. राहुलला वाचवण्यासाठी परिसरातील लोकही तेथे गोळा झाले मात्र उशीर झाल्याने विहिरीतच राहुल याचा मृत्यू झाला.
म्हाळसाकोरे (जि. नाशिक) : निफाड तालुक्यातील महाजनपूर येथे वादळाच्या भोवऱ्यात सापडून आठ वर्षीय मुलगा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना दिनांक (११) रोजी सायंकाळी घडली. मंगळवार दि.११ रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास राहुल वसंत फड (८) वर्ष व त्याचा लहान अक्षय (६) हे दोघे शेतात खेळत होते. त्यांच्याजवळच आजोबा पंढरीनाथ फड हे गुरे चारत होते व आई व वडील दूर शेतात कांदे काढत होते. तितक्याच पावसाचे वातावरण तयार झाले आणि खूप जोराचे वादळ सुटले.
आजोबांनी जोराची आरोळी ठोकत दोघांनाही घराकडे जाण्यास सांगितले आणि दोघेही मुले घराच्या दिशेने पळू लागले. परंतु वादळाचा जोर जास्त असल्याने राहुल हा विहिरीच्या दिशेकडे वाऱ्यासोबत लोटत गेला व कठडे नसलेल्या विहिरीत तो जाऊन पडला. त्याचबरोबर अक्षय याने आजोबाकडे धाव घेत घडलेली घटनेची माहिती आजोबांना दिली.
आजोबांनी विहिरीजवळ येत आरडाओरडा केला. राहुलला वाचवण्यासाठी परिसरातील लोकही तेथे गोळा झाले मात्र उशीर झाल्याने विहिरीतच राहुल याचा मृत्यू झाला. सायंकाळी साडेसात वाजता त्याचा मृतदेह विहिरी बाहेर काढण्यात आला. शोकाकुल वातावरणात रात्री उशिरा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.