४० गुंठ्याच्या मोजणीसाठी घेतली ३५ हजाराची लाच; नाशिकमध्ये भू-करमापक जाळ्यात
By अझहर शेख | Published: June 27, 2024 03:09 PM2024-06-27T15:09:46+5:302024-06-27T15:11:37+5:30
३५ हजार रूपयांची लाच स्वीकारली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले.
अझहर शेख, नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी गावात तक्रारदाराच्या जमिनीच्या ४० गुंठ्यांची मोजणी करून देण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयातील प्रभारी भू-करमापक म्हणून नोकरीला असलेले संशयित सचिन भाऊसाहेब काठे (३७,रा.दसक, जेलरोड) याने ४० हजार रूपयांची लाचेची मागणी केली होती. तडजोडअंती बुधवारी (दि.२६) ३५ हजार रूपयांची लाच स्वीकारली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जाळ्यात घेतले.
भूमी अभिलेख कार्यालय, त्र्यंबकेश्वरचे प्रभारी भू-करमापक असलेले सचिन काठे यांनी तक्रारदाराकडे मंगळवारी (दि.२५) ४० हजारांची लाच मागितली होती. तक्रारदाराने मौजे अंजनेरी येथील सर्व्हे क्रमांक १९९/ब मधील ४० गुंठे या क्षेत्राची मोजणी करून मिळावी यासाठी अर्ज केला होता. या कामाच्या मोबदलत्यात काठे यांनी सुरूवातीला पंचा समक्ष सुरुवातीला ४० हजार रूपयांची लाच मागितली. यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक परिक्षेत्र कार्यालयात संपर्क साधून तक्रार दिली. तक्रारीची शहनिशा केल्यानंतर नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मीष्ठा घारगे-वालावलकर यांनी सापळा कारवाईचे आदेश दिले. सापळा अधिकारी पोलीस निरिक्षक स्वप्नील राजपूत, हवालदार प्रभाकर गवळी, संदिप हांडगे, किरण धुळे, सुरेश चव्हाण, संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचला. काठे याने तडजोडअंती ३५ हजार रूपयांची लाच पंच, साक्षीदारांसमवेत स्वीकारली असता बुधवारी रंगेहात पकडले. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुरूवारी (दि.२७) भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राजपूत हे करीत आहेत.