सलीम कुत्तासोबत पार्टीमध्ये डान्स करणे सुधाकर बडगुजर यांना भोवले; गुन्हा दाखल
By अझहर शेख | Published: February 29, 2024 12:21 PM2024-02-29T12:21:24+5:302024-02-29T12:22:29+5:30
आमदार नितेश राणे यांनी विधीमंडळात याप्रकरणी लक्षवेधी सादर करत कारवाईची मागणी केली होती.यानंतर नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेकडून बडगुजर यांच्यासह डान्स च्या व्हिडिओत दिसणाऱ्या सर्वांची कसून चौकशी करण्यात आली होती.
नाशिक : 1993मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत नाशिकमधील आडगाव येथे हिंदुस्थान नगरात असलेल्या शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या नातेवाईकाच्या फार्म हाऊसमध्ये 2016साली पार्टी करत डान्स केल्याचा व्हिडीओ मागील वर्षी डिसेंबर महिन्यात समोर आला होता. आमदार नितेश राणे यांनी विधीमंडळात याप्रकरणी लक्षवेधी सादर करत कारवाईची मागणी केली होती.यानंतर नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेकडून बडगुजर यांच्यासह डान्स च्या व्हिडिओत दिसणाऱ्या सर्वांची कसून चौकशी करण्यात आली होती. हा अहवाल पोलीस आयुक्तांकडे सादर करण्यात आला. त्यांच्या आदेशानुसार आडगाव पोलीस ठाण्यात सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात बुधवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला.
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून पॅरोल वर बाहेर आलेल्या सलीम कुत्तासोबत २०१६साली झालेल्या रात्रीच्या पार्टीत सुधाकर बडगुजर डान्स करतानाचा व्हिडीओ समोर आला होता. सोशल मिडियामधून हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. गेल्या हिवाळी अधिवेशनात भाजपा आमदार नितेश राणे, शिवसेना मंत्री दादा भुसे यांनी सलीम कुत्ता पार्टी प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी चौकशी केली जाईल असे विधिमंडळात सांगितले होते.
आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बडगुजर यांच्या नातेवाईकांच्या फार्म हाऊसवर सलीम कुत्तासोबत झालेल्या पार्टी प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याच प्रकरणात नाशिक गुन्हे शाखेच्यावतीने चौकशी करण्यात येत होती. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधात्मक कलमाअंतर्गत बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बडगुजर यांच्यासह अनेकांची चौकशी
सलिम कुत्ता पार्टी प्रकरणात बडगुजर यांची अनेक वेळा पोलिसांनी मागील डिसेंबर महिन्यात चौकशी केली होती. या प्रकरणात पोलिसांनी पवन मटाले, रवी शेट्टी, सरप्रीतसिंह यांच्यासह आतापर्यंत 17 ते 18 जणांची चौकशी केली आहे. त्यानंतर आता अखेर सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे बडगुजर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. नाशिकच्या गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरू होता.
राजकिय आकसपोटी कारवाईचा बडगुजर यांचा आरोप?
गुन्हा दाखल झाल्यानंतर सुधाकर बडगुजर यांनी पत्रकार परिषद घेत, स्पष्टीकरण दिलं आहे. बडगुजर म्हणाले की, हा गुन्हा राजकीय आकसापोटी दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चौकशी न करता गुन्हा दाखल केला असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं बडगुजर यांनी म्हटलं आहे. इतकचं नाही तर माझ्यासोबत ज्यांनी नावं या प्रकरणात घेतली गेली, त्या सगळ्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. 8 वर्षांनंतर हे प्रकरण बाहेर काढून त्यावर कारवाई केली जाणं, हे निंदनीय असल्याचंही बडगुजर म्हणाले.