नाशिक मतदारसंघातील ‘या’ उमेदवारावर गुन्हा दाखल होणार, एकदाही दिला नाही हिशेब
By संकेत शुक्ला | Published: May 31, 2024 02:42 PM2024-05-31T14:42:34+5:302024-05-31T14:43:20+5:30
निवडणुकीची रणधुमाळी वाढली असतानाच उमेदवारांचा खर्चही वाढला होता. त्यांच्या खर्चाचा ताळमेळ घेण्यासाठी नाशिक आणि दिंडोरी अशा दोन्ही मतदारसंघात खर्चाचा ताळमेळ घेण्यात आला.
नाशिक : मुख्यमंत्री बैठक झाल्यानंतर खर्चाच्या तसेच इतर कारणांनी प्रमुख पक्षाच्या उमेदवारांना ताळमेळाबद्दल नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर खर्चाची बैठक थेट निवडणूक झाल्यानंतर होणार आहे. मात्र या दरम्यान नाशिक मतदारसंघातील इंडियन पिपल्स अधिकार पार्टीच्या उमेदवार भाग्यश्री अडसूळ यांनी एकदाही खर्च सादर न केल्याने त्यांच्यावर निवडणूक आयोगाच्या सूचनेनूसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
निवडणुकीची रणधुमाळी वाढली असतानाच उमेदवारांचा खर्चही वाढला होता. त्यांच्या खर्चाचा ताळमेळ घेण्यासाठी नाशिक आणि दिंडोरी अशा दोन्ही मतदारसंघात खर्चाचा ताळमेळ घेण्यात आला. घालून दिलेल्या मर्यादेत खर्च होतो आहे की नाही, हे बघण्यासाठी दाखल झालेल्या निरीक्षकांपुढे तीन वेळेस तपासणी करण्यात आली आहे. यासाठी नाशिक मतदारसंघातून ३१ पैकी ३० उमेदवारंनी हजेरी लावली. तर दिंडोरीतील सर्वच उमेदवारांनी हजेरी लावली. गैरहजर राहिलेल्या नाशिक मतदारसंघातील भाग्यश्री अडसूळ (इंडियन पीपल्स अधिकार पार्टी) यांना प्रारंभी दोन्ही वेळा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र त्यानंतरही त्या हजर न राहल्याने अखेर त्यांच्यावर आयोगाच्या सुचनेनुसार कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. खर्चच सादर न केल्यास पुढील निवडणुक लढविण्यापासून काही काळ निर्बंध घालण्याची तरतूद या कायद्यात आहे.