त्र्यंबकेश्वर येथील आश्रमशाळेतील मुलाचा मृत्यू, पोलिसात नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2023 06:56 PM2023-03-15T18:56:49+5:302023-03-15T18:57:03+5:30
त्र्यंबकेश्वर येथील आश्रमशाळेतील मुलाचा मृत्यू झाला.
वसंत तिवडे
त्र्यंबकेश्वर (नाशिक) : येथील आदिवासी सेवा समिती, नाशिक या संस्थेच्या आश्रमशाळेतील पहिलीचा विद्यार्थी निवृत्ती बाळू चावरे (६, रा. कळमुस्ते (ह) ता. त्र्यंबकेश्वर) याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. आश्रमशाळेच्या अधीक्षकांनी सदर मुलाचा मृत्यू हा आजारपणामुळे झाल्याचा दावा केला असला तरी या साऱ्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने तहसीलदार व पोलिस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
याबाबत आश्रमशाळेतील अधीक्षक नंदू देवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवृत्ती चावरे याच्याबरोबरच त्याच्या समवेत त्याच्या तीन बहिणीही शिक्षण घेत आहेत. होळीच्या सणासाठी सोमवार, दि. ६ मार्च रोजी सर्व भावंडे आपल्या पालकांबरोबर गेले होते. पालक कळमुस्ते ह. येथील असले तरी ते पोटा पाण्यासाठी विंचूर, ता. निफाड येथे द्राक्ष मळ्यात कुटुंबीयांसमवेत राहतात. तेथे या मुलांना नेल्यानंतर सुट्यांच्या काळात त्यांनी द्राक्षांचे सेवन केले. द्राक्षांच्या अतिसेवनाने निवृत्ती यास खोकला, सर्दी झाली होती. नेहमीचा सर्दी-खोकला म्हणून पालकांनीही त्याकडे दुर्लक्ष केले.
पालकांनी मुलांना दि. १३ मार्च रोजी आश्रमशाळेत आणून सोडले आणि ते परत विंचूरला निघून गेले. सर्व मुले व्यवस्थित होती. सायंकाळच्या भोजनास ही मुले गेली नाहीत. कारण त्यांनी घरूनच डबा आणला होता; पण सहा-साडेसहा वाजेच्या सुमारास खांबाला धरून चकरा मारणारा निवृत्ती अचानक चक्कर आल्यामुळे खाली कोसळला. हातापायाची कापरे होऊ लागल्याने आश्रमशाळेतील देवरे व जाधव या शिक्षकांनी त्यास जवळच्या उपजिल्हा रुग्णालयात नेले. तेथील वैद्यकीय अधिकारी डाॅ. राहुल येवले यांनी त्याला तपासून मयत घोषित केले. त्यानंतर पोलिसांना घटनेची खबर देण्यात आली तर पालकांनाही आणण्यात आले. शवविच्छेदनात मृत्यूचे निदान न्यूमोनिया असल्याचा रिपोर्ट डाॅक्टरांनी दिला असल्याचेही देवरे यांनी सांगितले. त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक बिपीन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सचिन गवळी करत आहेत.
नियमित आरोग्य तपासणीची मागणी
नाशिक जिल्ह्यातील सर्वच आदिवासी मुलांच्या निवासी आश्रमशाळेत नियमितपणे आरोग्य तपासणी करण्याची मागणी एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. निवृत्तीच्या मृत्यूप्रकरणी दोषींवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि पोलिस निरीक्षक त्र्यंबकेश्वर यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष तुकाराम लचके, जिल्हा सचिव जयराम बदादे, भावडू निरगुडे, तालुका उपसचिव मुरलीधर जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.