मद्य वाहतूक करणाऱ्या कारचा नाशिकमध्ये सिनेस्टाईल पाठलाग; महामार्गावर फुटले चाक अन्...
By अझहर शेख | Published: September 9, 2022 12:20 PM2022-09-09T12:20:56+5:302022-09-09T12:21:26+5:30
अंबड औद्योगिक रस्त्यावरुन गरवारे चौकात महामार्गावर आलेल्या एका गुजरात आरटीओची पासिंगची कारवर एक्साईजच्या गस्ती पथकाला संशय आला.
नाशिक :
अंबड औद्योगिक रस्त्यावरुन गरवारे चौकात महामार्गावर आलेल्या एका गुजरात आरटीओची पासिंगची कारवर एक्साईजच्या गस्ती पथकाला संशय आला. यावेळी पथकाने कारचालकाला थांबण्याचा इशारा केला; मात्र त्याने शासकिय वाहन ओळखून कारचा वेग प्रचंड वाढवत महमार्गावरुन द्वारकेच्या दिशेने सुसाट दामटविली. मुंबईनाका येथे वळण घेताना कारचे पुढील दोन्ही चाक फुटले व कार वाहतुक बेटावर आदळली. कारमध्ये चोरकप्पे तयार करुन त्यामधून प्रतिबंधित मद्याच्या बाटल्यांची अवैध वाहतुक केली जात होती.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक-१चे निरिक्षक जयराम जाखेरे, दुय्यम निरिक्षक आर.सी.केरीपाळे, आर.व्ही.राऊळ, जवान धनराज पवार, राहुल पवार, सुनील दिघोळे, आदींचे पथक बुधवारी (दि.७) रात्री महामार्गावर गस्तीवर होते. यावेळी पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी कारवर (जी.जे०५ सीआर१७६३) पथकाला संशय आला. कर्मचाऱ्यांनी कारचालकाला थांबण्याचा इशारा केला; मात्र त्याने कार भरधाव दामटविली. महामार्गावरुन पथकाकडून कारचा सिनेस्टाईल पाठलाग केला जात होता; मात्र कारचा वेग शंभराच्यापुढे असल्याने कार थांबत नव्हती. मुंबईनाक्याजवळ उड्डाणपुलाखाली वळण घेताना या कारचे पुढील चाक फुटले व कार थेट वाहतुक बेटाला जाऊन धडकली. पथक पाठीमागून पोहचेपर्यंत कारचालक कारमधून उतरून पळून गेला; मात्र कारच्या पाठीमागील सीटवर बसलेला व्यक्ती संशयित फेनिलकुमार अमृतभाई पटेल (रा. उदवाडा, जि. वलसाड) यास ताब्यात घेतले. यावेळी कारचे बंपर फुटल्याने पुढील बाजूने चोर कप्प्यांत दडविलेल्या काचेच्या दारूच्या बाटल्याही फुटल्या व मद्य गळू लागल्याने पथकाला अवैध मद्याची वाहतुक केली जात असल्याची खात्री पटली. पथकाने क्रेनच्या सहाय्याने कार उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात आणली. प्रतिबंधित मद्यसाठा संशयित पटेलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.