पंतप्रधान मोदींच्या कारकिर्दीवर रचलेले शंभर श्लोक कोरलेला ताम्रपट अर्पण
By संजय पाठक | Published: August 8, 2023 05:23 PM2023-08-08T17:23:10+5:302023-08-08T17:28:26+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची संस्कृती आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवल्याचे त्यांचे समर्थक मानतात.
नाशिक- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची संस्कृती आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवल्याचे त्यांचे समर्थक मानतात. त्यामुळे त्र्यंबकेश्वर येथील महंत पिठाधिश्वर स्वामी अनिकेत शास्त्री देशपांडे महाराज आणि साहित्यचार्य यतीशचंद्र मिश्रा यांनी मोदींच्या यशस्वी कारकिर्दिवर शंभर श्लोक लिहिले आहेत. हे श्लोक ताम्रपटावर कोरून त्यांनी हा पवित्र ताम्रपट आज पंतप्रधान मोदींना अर्पण केला आहे. या ताम्रपटाला मोदी शतकम असे नाव देण्यात आले असून ताम्रपटावर कोरलेले श्लोक पाहुन मोदी भारावून गेले.
यावेळी महंतांच्या शिष्टमंडळाने मोदींकडे सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशकात संस्कृत विश्वविद्यालय उभारावेत, काशी विश्वनाथच्या धरतीवर त्र्यंबकेश्वर येथे कॉरिडॉर व्हावा तसेच भारतातील सर्व मठ आणि आखाड्यांमध्ये महिलांसाठी साध्वी भवन उभारण्यात यावे आदि आग्रही मागण्या केल्या.
आज नाशिकचे खासदार हेमंत गेाडसे यांच्या नेतृत्वाखाली त्र्यंबकेश्वर येथील महंत पिठाधिश्वर स्वामी अनिकेत शास्त्री देशपांडे यतीशचंद्र
मिश्रा,शैलेन्द्र उदावंत,पंकज मिश्रा आदि धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी दिल्लीत जात पंतप्रधानांची भेट घेतली. यावेळी ताम्रपट मोदी यांना अर्पण केला. नाशिकमधील सुजित जोशी, दिपेश देशपांडे आणि मिलिंद फडके या कलाकारांनी दीड महिना अहोरात्र काम करून श्लोक ताम्रपटावर कोरण्याचे काम केले. श्लोक कोरलेला ताम्रपट तीन फुट बाय सव्वा दोन फुट इतक्या आकाराचा आहे.