नाशिकमध्ये नव्या वर्षाच्या प्रारंभीच एका गुन्हेगाराचा दगडाने ठेचून खून; स्वागताच्या सेलिब्रेशनला गालबोट
By अझहर शेख | Updated: January 1, 2025 05:32 IST2025-01-01T05:31:04+5:302025-01-01T05:32:48+5:30
नव्या वर्षाच्या जल्लोषाची सर्वत्र धामधूम सुरू असताना शहरातील मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या खुनाच्या घटनेने खळबळ उडाली...

नाशिकमध्ये नव्या वर्षाच्या प्रारंभीच एका गुन्हेगाराचा दगडाने ठेचून खून; स्वागताच्या सेलिब्रेशनला गालबोट
नाशिक : एकीकडे 'थर्टी फर्स्ट'च्या जल्लोषाला सुरुवात झाली अन दुसरीकडे उंटवाडीरोडवरील क्रांतीनगर भागात एका सराईत गुन्हेगाराचा त्याच्या सराईत गुन्हेगार मित्रांनी मद्यपान करताना डोक्यात दगड टाकून खुन केल्याची घटना मंगळवारी (दि. ११) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. लक्ष्मण गारे (३४, रा.क्रांतीनगर) असे मृत्यूमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे.
नव्या वर्षाच्या जल्लोषाची सर्वत्र धामधूम सुरू असताना शहरातील मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या खुनाच्या घटनेने खळबळ उडाली. उंटवाडी रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारती पाठीमागे असलेल्या मोकळ्या मैदानात मद्यप्राशन करण्यासाठी आलेले तिघांपैकी दोघांनी कुरापत काढून लक्ष्मणच्या डोक्यात दगड टाकला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लक्ष्मण हा घरी असताना रात्री दहा वाजेच्या सुमारास संशयित गणेश नितीन भावसार व रिजवान काजी (दोघे रा.क्रांतीनगर) यांनी त्याला घरातून दुचाकीने घेऊन आले. 'थर्टी फर्स्ट'ची पार्टी करू असे सांगून त्याला उंटवाडी रोडवरील मोकळ्या मैदानात घेऊन गेले. तेथे जुन्या भांडणाची कुरापत काढून लक्ष्मणसोबत वाद घातला. एकमेकांना शिवीगाळ करत त्याच्या डोक्यात दोघांनी दगड टाकला. यामुळे तो जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. यानंतर दोघेही हल्लेखोर दुचाकीने घटनास्थळावरून फरार झाले.
पोलिसांचा मोठा पाऊस फाटा घटनास्थळी पोहोचला तातडीने गुन्हे शाखेची पथके संशयीतांच्या मागावर रवाना केली. मृतदेहचा पंचनामा करून तातडीने पोलिसांनी मृतदेह शासकीय जिल्हा रुग्णालयात हलविला. दरम्यान, जिल्हा रुग्णालयाच्या आवरात रात्री मयत युवकच्या नातेवाईक, मित्र परिवाराने गर्दी केली होती. भावसार व काजी हे दोघेही पोलिसांच्या यादीवरील सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुद्ध यापूर्वीही मारहाण व दुखापतीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत मुंबई नाका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.