नोटबंदीसारखे निर्णय देशाला परवडणारे नाही; सरकार असं चालतं का?, राज ठाकरेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 11:13 AM2023-05-20T11:13:49+5:302023-05-20T11:14:01+5:30

राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

A decision like demonetisation cannot be afforded by the country; Does the government work like this?, Raj Thackeray's question | नोटबंदीसारखे निर्णय देशाला परवडणारे नाही; सरकार असं चालतं का?, राज ठाकरेंचा सवाल

नोटबंदीसारखे निर्णय देशाला परवडणारे नाही; सरकार असं चालतं का?, राज ठाकरेंचा सवाल

googlenewsNext

२ हजार रुपयांची नोट वितरणातून मागे घेण्यात येत असल्याचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी अचानक जाहीर केला. या नोटा बदलून घेण्यास अथवा बँकेत जमा करण्यास नागरिकांना ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. 

८ नोव्हेंबर २०१६ रोजी केंद्र सरकारने ५०० आणि १,००० रुपयांच्या नोटा एका रात्रीत बंद केल्या होत्या. त्यावेळीही नोटा बदलून घेण्यास वेळ दिला होता. यावेळी २ हजारांच्या नोटेच्याबाबतीत मात्र नोटा थेट बंद न करता ही नोट ३० सप्टेंबरपर्यंत चलनात कायम ठेवली आहे. तोवर त्या बँकांत जमा करता येतील. ३० सप्टेंबरनंतर काय? याबाबत आरबीआयने अद्याप काही म्हटलेले नाही.

आरबीआयच्या या निर्णयानंतर आरोप-प्रत्योराप सुरू झाले. यामध्ये विरोधकांकडून मोदी सरकारवर निशाणा साधला जात आहे. याचदरम्यान मनसेप्रमुखराज ठाकरे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. हा धरसोडपणा आहे. तज्ज्ञांना विचारुन हा निर्णय झाला असता तर ही वेळ आली असती, असं राज ठाकरेंनी सांगितले. राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

राज ठाकरे पुढे म्हणाले की, आता लोकांनी परत बँकेमध्ये पैसे टाकायचे, परत तुम्ही नवीन नोटा आणणार, असं सरकार चालतं का? असे प्रयोग होतात का?, असा निशाणा राज ठाकरेंनी लगावला. त्यावेळी जेव्हा नोटा आणल्या होत्या तेव्हा त्या एटीएममध्येही जात नव्हत्या. म्हणजे नोटा एटीएममध्ये जात आहेत की नाहीत हे देखील पाहिलं नव्हतं. नोटबंदीसारखे निर्णय देशाला परवडणारे नसतात, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

त्र्यंबकेश्वरमधील १०० वर्ष जुनी परंपरा मोडू नका- 

त्र्यंबकेश्वरमधील वादावर देखील राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा तिथल्या लोकांचा प्रश्न आहे. इतर धर्मांचा माणूस आपल्या मंदिरात आला तर भ्रष्ट होण्याइतका आपला धर्म कमकुवत आहे का?, मी देखील अनेक दर्ग्यात गेलो आहे, असं राज ठाकरेंनी सांगितलं. गड किल्ल्यांवरील दर्गे हटवले पाहिजे. चुकीच्या गोष्टींवर प्रहार केलाच पाहिजे. मराठी मुसलमान जिथं राहतात तिथं दंगली होत नाही, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

Web Title: A decision like demonetisation cannot be afforded by the country; Does the government work like this?, Raj Thackeray's question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.