नाशिकच्या एका प्रसिद्ध बिल्डरचे राहत्या घरापासून अपहरण; परिसरात उडाली खळबळ
By अझहर शेख | Updated: September 3, 2023 05:54 IST2023-09-03T05:54:30+5:302023-09-03T05:54:45+5:30
कुटुंबियांशी चर्चा करून माहिती घेत तातडीने विविध पथके वेगवेगळ्या भागांमध्ये रवाना करण्यात आली.

नाशिकच्या एका प्रसिद्ध बिल्डरचे राहत्या घरापासून अपहरण; परिसरात उडाली खळबळ
नाशिक : शहरातील एक सुप्रसिद्ध नामवंत बांधकाम व्यावसायिकाचे त्याच्या राहत्या घरापासून शनिवारी (दि.२) अपहरण केल्याची घटना रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच नाशिक शहराचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे हेदेखील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपासाचे आदेश देत विविध पथके शोधासाठी रवाना केली आहेत.रविवारी पहाटे पोलिसांची सर्वच पथके अपहरणकर्त्यांचा शोध घेत होती.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, नाशिक शहरातील एका प्रसिद्ध बांधकाम समुहाचे अध्यक्ष पदावर असलेले बांधकाम व्यावसायिकाचे त्यांच्या राहत्या घरासमोरून अज्ञात इसमांनी दुचाकी, चारचाकी वाहनांचा वापर करत अपहरण केले. याप्रकरणी घटनेची माहिती मिळताच त्वरित सर्वच पोलीस उपायुक्त, सहायक आयुक्तांसह गुन्हे शाखेच्या तीनही युनिटचे अधिकारी, कर्मचारी बांधकाम व्यावसायिक राहतात त्या बंगल्याजवळ दाखल झाले.
कुटुंबियांशी चर्चा करून माहिती घेत तातडीने विविध पथके वेगवेगळ्या भागांमध्ये रवाना करण्यात आली. पोलिसांनी आजूबाजूच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पाहून त्याआधारे अपहरणकर्त्यांची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे हे रविवारी मध्यरात्रीपर्यंत पोलीस ठाण्यात बसून विविध पथकांकडून माहिती घेत मार्गदर्शन करत होते. पोलिसांच्या पथकांनी मुंबई, पुणे, पालघर, सापुतारा च्या दिशेने माग काढण्याचा प्रयत्न केला. ग्रामीण पोलिसांनाही याबाबत माहिती कळवून सतर्क राहत जिल्हा सीमावर्ती भागात नाकाबंदीच्या सूचना देण्यात आल्या. बांधकाम व्यवसायिकाच्या अपहरणाच्या घटनेने संपूर्ण नाशिकमध्ये खळबळ उडाली.