बांधकाम व्यावसायिकाला पाच हजारांचा दंड; डेंग्यू उत्पत्ती स्थळांची महापालिकेकडून पाहणी
By Suyog.joshi | Published: December 13, 2023 10:26 AM2023-12-13T10:26:38+5:302023-12-13T10:26:52+5:30
मनपाच्या आरोग्य विभागाने शिंगाडा तलावाच्या मागील बाजूस असलेले 'राज्य महामंडळाच्या बस डेपो' मध्ये भेट दिली असता त्यात काही त्रूटी आढळून आल्या.
नाशिक- शहरात वाढणाऱ्या डेंग्यू रूग्णसंख्येच्या पाश्व'भूमीवर महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला असून शहरात शिंगाडा तलाव परिसरात तपासणीदरम्यान डास उत्पत्ती ठिकाण आढळल्याने झुलेलाल कंपनीस पाच हजार रूपयांचा दंड ठोठावला. शहरात ठिकठिकाणी डेंग्यूच्या चाचण्याही केल्या जात आहेत. शहरात सुरू असलेल्या विविध बांधकाम साइट्सवरही ॲबेट नावाचे औषध टाकून डेंग्यूच्या डासअळी नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
पश्चिमच्या प्रभाग १३ मधील शिंगाडा तलाव परिसर, एन डी पटेल रोड, एसटी कार्यशाळा आगार क्रमांक एक एक या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेचे जीवशास्त्रज्ञ. डॉ. नितीन रावते यांनी दैनंदिन कामकाजाची तपासणी करून परिसरात असलेल्या सर्व डास उत्पत्ती स्थळांची माहिती घेतली. डिव्हिजन एक येथील आगार प्रमुख श्री ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या भागामध्ये असलेल्या डास उत्पत्ती स्थळाची माहिती दिली.
पाण्याचा निचरा होत नाही
मनपाच्या आरोग्य विभागाने शिंगाडा तलावाच्या मागील बाजूस असलेले 'राज्य महामंडळाच्या बस डेपो' मध्ये भेट दिली असता त्यात काही त्रूटी आढळून आल्या. त्यात वाहने धुण्याच्या जागे जवळ पाणी साठून राहत आहे. त्या पाण्याचा निचरा होत नाही. साठून राहिलेले पाणी तेलमिश्रित असून देखील, त्यामध्ये सर्व स्टेजेस मधील डास उत्पत्ती स्थाने आढळून आली. परिसरात असलेल्या ड्रेनेज लाईनच्या टाक्यांचे ढापे उघडे आहेत ते झाकण्यात यावेत. परिसरामध्ये कचरा व गवत आढळून आले ,ज्यामुळे अस्वच्छता निर्माण होत आहे. तसेच कचऱ्यामध्ये असलेल्या प्लास्टिक फॉइल्समध्ये पाणी साठून त्यामध्ये देखील डास उत्पत्ती स्थाने आढळून आलेली आहेत. त्यामुळे सदर प्लास्टिकच्या कचऱ्याचा त्वरित नायनाट करण्यात यावा व भविष्यात असा कचरा गोळा होऊ नये यासाठी नियमित कार्यवाही करत राहावी अशा सुचना देण्यात आल्या.
नागरिकांनी सतर्क राहावे. घराजवळ कोणतेही पाण्याचे डबके साचू देऊ नये. काही तक्रार असल्यास आरोग्य विभागाकडे कळवावी.
-डॉ. नितीन रावते, मलेरिया विभाग प्रमुख