नाशिकमध्ये मध्यरात्री उडाला आगीचा भडका; तीन दुकाने भस्मसात
By अझहर शेख | Published: October 10, 2023 12:41 AM2023-10-10T00:41:23+5:302023-10-10T00:42:28+5:30
रात्री उशिरापर्यंत जवानांकडून शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात वित्तीय नुकसान झाले आहे.
नाशिक : जुने नाशिकमधील चौक मंडई येथे जहांगीर मशीदीच्याजवळ असलेल्या दुकानांपैकी तीन दुकानांना मंगळवारी (दि.१०) मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. रात्री उशिरापर्यंत जवानांकडून शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात वित्तीय नुकसान झाले आहे.
जुने नाशिक मधील चौक मंडई येथे विविध दुकाने आहेत यापैकी पीरमोहना कबरस्तान भिंतीला लागून असलेल्या कालीम रजा बुक डेपो, मिर्झा बुक डेपोसह अजून एका दुकानात आगडोंब उसळला. घटनेची माहिती मिळताच शिंगाडा तलाव येथील मुख्यालयातून दोन बंब पंचवटी उपकेंद्र विभागीय कार्यालय, सातपूर, सिडको या उपकेंद्रातून बंब घटनास्थळी रवाना करण्यात आले. महापालिका अग्निशमन दलाचे सहा बंब दाखल झाले. जवानांकडून आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. अद्याप आग आटोक्यात आली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी जमल्याने आपत्कालीन कार्यात अडथळा निर्माण झाला. तसेच काही अतिउत्साही तरुण अग्निशमन दलाच्या जवानांच्या हातातून पाण्याचे 'होज' हिसकावून घेत स्वतः पाणी मारू लागले, यामुळे अधिकच गोंधळ उडाला. घटनास्थळी भद्रकाली पोलीस ठण्याकडून बंदोबस्त वाढविण्यात आला. तसेच बघ्यांना घटनास्थळाहून पोलिसांनी 'प्रसाद' देत पांगविले. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळविता आले.
शिंगाडा तलाव मुख्यालय घटनास्थळापासून जवळ असल्याने या ठिकाणाहून वाढीव बंब मागविण्यात आले. ही तीनही दुकाने विविध पुस्तके, धार्मिक ग्रंथ, कपडे, सजावट साहित्य विक्रीची आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात विद्युत माळा व आदी विद्युत साहित्यदेखील नुकत्याच साजरी झालेल्या ईद ए मिलाद च्या निमित्ताने विक्रेत्यांनी भरून ठेवले होते. रात्री साडे दहा वाजता दुकाने बंद झाल्यानंतर पावणे 12 वाजेच्या सुमारास आगीचा भडका उडाला व क्षणातच तीनही दुकाने आगीच्या विळख्यात सापडली. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.