1 लाखाची लाच घेताना नाशिकमध्ये एका ग्रामसेवकाला ठोकल्या बेड्या
By अझहर शेख | Published: November 30, 2023 11:08 PM2023-11-30T23:08:29+5:302023-11-30T23:09:10+5:30
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाढोली ग्रामपंचायतीच्या हद्दीत तेथील गावाचे विविध कामे तक्रारदार ठेकेदाराने घेतली होती.
नाशिक : ठेकेदाराने केलेल्या कामाचे देयकाची रक्कम ग्रामपंचायतीकडून मंजुर करण्यासाठी वाढोलीच्या ग्रामसेवकाने त्याच्याकडे १ लाख ४ हजार रूपयांची लाचेची मागणी केली. ही रक्कम संशयित ग्रामसेवक अनिलकुमार मनोहर सुपे (४६) याने नाशिक शहरात गुरूवारी (दि.३०) स्वीकारली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून त्यास जाळ्यात घेतले.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाढोली ग्रामपंचायतीच्या हद्दीत तेथील गावाचे विविध कामे तक्रारदार ठेकेदाराने घेतली होती. ही कामे ठेकेदाराने दिलेल्याम मुदतीत पुर्ण केली. यापैकी काही देयकांची रक्कम ग्रामपंचायतीकडून ठेकेदाराला मिळाली आहे. मात्र काही कामाच्या देयकाची रक्कम २ लाख ९९ हजार ७७६ रूपयांचे देयक मिळालेले नाही. याबाबत ठेकेदाराने ग्रामसेवक संशयित सुपे याच्याकडे विचारणा केली. हे देयक मंजुर करण्यासाठी ३० हजार रुपये व यापुर्वी ठेकेदाराने केलेल्या कामाचे देयके मंजुर केलेले आहेत, यासाठी बक्षीस म्हणुन ७० हजार रुपये व सर्व देयकांचे ऑडिट करण्याचे ४ हजार रुपये असे एकुण १ लाख ४ हजार रुपयांची लाच संशयित अनिलकुमार सुपे यांनी मागितली.
तेवढी रक्कम गुरूवारी संध्याकाळनंतर स्वीकारली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळा अधिकारी पोलीस निरिक्षक निलिमा केशव डोळस, नाईक संदीप हांडगे, प्रभाकर गवळी, सुरेश चव्हाण यांच्या पथकाने त्यास रंगेहात पकडले. त्याच्याविरूद्ध सरकारवाडा पोलिस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.