नाशिकहून २३ दिवसांचा पायी प्रवास करत उंटांचा कळप पोहचला राजस्थानात!
By अझहर शेख | Published: June 13, 2023 02:52 PM2023-06-13T14:52:09+5:302023-06-13T14:52:28+5:30
चुंचाळे पांजरापोळ येथून पाहुणचार घेतल्यानंतर १९ मे रोजी सकाळी ९५ उंटांचा कळप मार्गस्थ झाला.
नाशिक : येथील चुंचाळे व मालेगावच्या गोशाळेतून २३ दिवसांपूर्वी मरुभूमी राजस्थानच्या दिशेने सात रायकांसोबत निघालेल्या १५३ उंटांपैकी १२३ उंटांचा कळप सोमवारी (दि.१२) संध्याकाळी मायभूमीत पोहोचला. धरमपूरपासून पुढील प्रवासात २५ उंटांची प्रकृती खालावल्याने त्यांना गुजरातच्या वाझदामध्येच थांबविण्यात आले. त्यामधील दोन उंट मृत्युमुखी पडले असून उर्वरित उंटाची प्रकृती स्थिर आहे. त्यांनाही लवकरच सिरोहीला नेले जाणार असल्याचे महावीर कॅमल सेन्च्युरीचे सचिव सुरेंद्र भंडारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
चुंचाळे पांजरापोळ येथून पाहुणचार घेतल्यानंतर १९ मे रोजी सकाळी ९५ उंटांचा कळप मार्गस्थ झाला. या कळपाने रविवारीच (दि. २१) महाराष्ट्राची बॉर्डर ओलांडली खरी; मात्र येथूनच पुढे मार्ग भरकटला होता. २३ मे रोजी उंटांचा हा कळप वाझद्याहून पुढे रात्री आठ वाजता धरमपूरस्थित श्रीमद राजचंद्र मिशनच्या प्राणी निवारागृहात (जीवमैत्रीधाम) पोहोचला होता. सुरुवातीपासून ‘लाेकमत’ने उंटांबाबत पाठपुरावा सुरू ठेवला होता.
मालेगाव येथील गोशाळेतून २१ मे रोजी दुपारी धरमपूरच्या दिशेने निघालेले ५३ उंट २४ मे रोजी संध्याकाळी जीवमैत्रीधाममध्ये पोहोचले.
याठिकाणी पशूंच्या दवाखान्यातील २० पशुवैद्यक व त्यांच्या सहायकांकडून उंटांवर आवश्यक ते औषधोपचार करण्यात आले. दोन दिवसानंतर तेथून २६ मे रोजी पुढील प्रवासाला प्रारंभ करण्यात आला. दरम्यान, काही अंतर चालल्यानंतर वाझदामध्ये एक प्राणी प्रेमी संस्थेकडे २५उंटांना थांबून ठेवण्यात आले आहे. उर्वरित उंटांच्या कळपाने राजस्थानच्या सिरोहीपर्यंतचे लांब पल्ल्याचे शेकडो किलोमीटरचे अंतर यशस्वीरित्या कापले. सोमवारी संध्याकाळी १२३ उंट सिरोहीमध्ये दाखल झाल्याचे तेथील उंट संवर्धनासाठी काम करणाऱ्या लोकहित पशुपालक संस्थेचे संस्थापक हनुमंतसिंग राठोड यांनी सांगितले.
एकूण १६ उंटांनी गमावले प्राण
गुजरातमार्गे नाशिकमध्ये उंटांचा कळप दाखल झाल्यानंतर पांजरापोळमध्ये १९ मेपर्यंत १३ तर मालेगावात १ आणि नाशिक- राजस्थान प्रवासादरम्यान वाझदामध्ये २ असे एकूण १६ उंट मृत्युमुखी पडले आहेत. तसेच मालेगावात उंटाच्या मादीने (सांडणी) एका ‘टोडिया’ला जन्म दिला होता.
७ रायकांनी पोहोचविले १२३उंट
नाशिक ते थेट राजस्थानपर्यंत १२३उंटांना सुखरूपपणे अवघ्या सात ‘रायकां’कडून पोहोचविण्यात आले. उंटांच्या कळपासोबत लोकहित पशुपालक संस्थेचे हे सर्व ‘रायका’पायी चालले. अत्यंत आव्हानात्मक व खडतर प्रवास त्यांनी पूर्ण करत येणाऱ्या विविध अडचणींवर मात केली.