त्र्यंबकराजाच्या पिंडीत आढळला बर्फाचा गोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2022 02:08 AM2022-07-02T02:08:00+5:302022-07-02T02:09:21+5:30
त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग त्र्यंबकराजाच्या मंदिरातील पिंडीत सदोदित पाणी जमा होत असते. ते पाणी सारखे हाताने उपसावे लागते. पण गुरुवारी (दि. ३०) या पिंडीत बर्फाचा गोळा बघायला मिळाला अन् चर्चेला एकच उधाण आले
त्र्यंबकेश्वर : येथील ज्योतिर्लिंग त्र्यंबकराजाच्या मंदिरातील पिंडीत सदोदित पाणी जमा होत असते. ते पाणी सारखे हाताने उपसावे लागते. पण गुरुवारी (दि. ३०) या पिंडीत बर्फाचा गोळा बघायला मिळाला अन् चर्चेला एकच उधाण आले. कुणी चमत्काराच्या गोष्टी केल्या तर कुणी ईशान्य भारतात संकटाची ही चाहूल असल्याचा दावा केला. दरम्यान, विज्ञान अभ्यासकांनी मात्र चमत्काराचा दावा खोडून काढला आहे, तर मंदिर प्रशासनाने सीसीटीव्हीचे चित्रण तपासूनच अधिकृत माहिती घोषित केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. गुरुवारी (दि.३० जून) नेहमीप्रमाणे पहाटेच्या सुमारास मंदिरातील पुजारी सुशांत तुंगार, आकाश तुंगार हे गर्भगृहात साफ सफाई करण्यासाठी गेले असता त्यांनी पिंडीतील पाणी उपसण्यासाठी हात घातल्यानंतर हाताला थंडगार बर्फाचा स्पर्श झाला. पिंडीतील खळग्यात हात घातल्यानंतर पाण्याचे बर्फ झालेले आढळून आले. या घटनेची माहिती सर्वत्र पसरताच चमत्काराचा दावा केला गेला. अनेकांनी त्र्यंबकराजाच्या मंदिरात धाव घेतली; परंतु गर्भगृहात पुजाऱ्यांशिवाय कोणालाच प्रवेश नसल्याने बाहेरूनच दर्शन घेतले. हिवाळ्यात ऐन कडाक्याच्या थंडीत अवघे ७ ते ८ डिग्री सेल्सिअस तापमान असताना कधी पिंडीतील पाण्याचे बर्फ झाले नव्हते. सध्या पावसाळा सुरू असला तरी ऊनही पडते आणि उष्माही जाणवतो. अशा परिस्थितीत पिंडीतील पाण्याचे बर्फात रूपांतर कसे झाले, याचा जाणकारांनी खुलासा करावा, अशी चर्चा आहे.
कोट....
पाण्याचे बर्फात रूपांतर होण्यासारखी परिस्थिती नसताना पाण्याचे रूपांतर बर्फात झाले कसे याबाबत वैज्ञानिक दृष्टिकोनातून तपासणी झाली पाहिजे. घटना तर घडली, पण ती का घडली याचा शोध वैज्ञानिकांनी घ्यावा. शेवटी श्रद्धेचा भाग आहे. ज्यांना जो अर्थ लावायचा तो लावावा. मात्र, यावर भाष्य करणे योग्य नाही.
- सत्यप्रिय शुक्ल, विश्वस्त, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट
कोट...
सध्या थंडीचा महिना नाही. धड पावसाळाही नाही. गर्भगृहात दमट व कोंदट वातावरण असते. बर्फ होण्यासाठी उणे शंभर तापमान लागते. दगड हा उष्णतेचा वाहक नाही. त्यामुळे या प्रकाराला वैज्ञानिक आधार नाही. केवळ लक्ष वेधून घेण्याचा हा प्रकार असावा. चमत्कार तर बिलकुल नाही.
- प्राचार्य किशोर पवार, विज्ञान अभ्यासक
इन्फो
अंनिसने केली कारवाईची मागणी पिंडीवर बर्फ जमा होणे ही पूर्णतः नैसर्गिक प्रक्रिया आहे. वातावरणातील तापमानाची घट हे त्यामागील प्रमुख कारण असल्याचे अंधश्रद्धा निर्मुलन समितीने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. सामान्यपणे गाभार्यातील तापमान आणि बाहेरचे तापमान यामध्ये १२ ते१३ अंशापर्यंत तफावत असते. साहजिकच गाभाऱ्यातील बाष्पयुक्त हवेला थंडावा मिळाल्याने आणि पिंडीचा भाग गुळगुळीत असल्याने तेथे बर्फाचे लहान लहान थर जमा होतात. रात्रीच्या वेळी तापमानात अधिक घट झालेली असते. त्यामुळे पहाटेच्या वेळी बर्फ तयार होण्याचे प्रमाण वाढते . यात कोणताही दैवी चमत्कार किंवा चांगले-वाईट घडण्याचे दैवी संकेत नाहीत. अशा अफवा पसरविणाऱ्यांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अंनिसच्या वतीने करण्यात आली आहे.