एक यांत्रिकी झाडू करणार प्रतिदिन १६० किमी रस्त्याची सफाई! पुढच्या आठवड्यापासून स्वच्छता
By Suyog.joshi | Published: November 21, 2023 01:56 PM2023-11-21T13:56:26+5:302023-11-21T13:56:36+5:30
साडेतीन मीटर रुंद रस्त्यावर एका यांत्रिकी झाडूमार्फत ४० किलोमीटरप्रमाणे प्रतिदिन १६० किलोमीटर रस्त्याची सफाई केली जाणार आहे.
नाशिक : महापालिकेतर्फे यांत्रिकी झाडू शहरात दाखल झाल्यानंतर आरटीओकडून या चारही मशीनची पासिंग करण्यात आली आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यापासून शहरातील जववळपास २८० किलोमीटर मुख्य रस्त्यांची या झाडूने सफाई होऊ शकते. रस्ते स्वच्छतेसाठी महापालिकेने इटलीहून खरेदी केलेले ३३ कोटींचे चार यांत्रिकी झाडू काही दिवसांपूर्वीच शहरात दाखल झाले होते. आरटीओची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर यांत्रिकी झाडू हाताळणारे प्रशिक्षित कर्मचारी मिळताच या झाडूद्वारे रस्ते स्वच्छता केली जाणार आहे. साडेतीन मीटर रुंद रस्त्यावर एका यांत्रिकी झाडूमार्फत ४० किलोमीटरप्रमाणे प्रतिदिन १६० किलोमीटर रस्त्याची सफाई केली जाणार आहे.
नॅशनल क्लीन एअर प्रोग्रामांतर्गत नाशिक महापालिकेला प्राप्त झालेल्या निधीतून विविध उपक्रम राबविले जात आहे. यात हवा गुणवत्ता नियंत्रणाबरोबरच रोजचे निरीक्षण नोंदविण्यासाठी केंद्र उभारणे, विद्युतदाहिनी बसविणे, बांधकाम डेब्रिज विल्हेवाट प्रकल्प, दुभाजकांमध्ये शोष वनस्पती, एकीकृत सिग्नल प्रणाली, सुलभ शौचालयांवर सोलर रूफ टॉप बसविणे आदी कामे होणार आहेत. यातूनच महापालिकेच्या यांत्रिकी विभागाकडून रस्ते झाडण्यासाठी यांत्रिकी झाडू (रोड स्विपर) खरेदी करण्यात आले असून, इटलीहून यांत्रिकी झाडू आणण्यात आले आहे.
दि. २० ऑगस्ट २०२१ला सहा विभागांत यांत्रिक झाडू खरेदीचा निर्णय घेण्यात आला. पाच वर्षांसाठी देखभाल-दुरुस्तीसह ३३ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव महासभेवर मंजूर करण्यात आला. एप्रिल २०२३मध्ये कार्यारंभ आदेश देण्यात आले. ऑक्टोबरमध्ये यांत्रिकी झाडू पुरविण्याची मुदत संपुष्टात आली; परंतु परदेशातून मुंबई डॉकयार्ड येथे आल्यावर तांत्रिक बाबी पूर्ण करण्यात वेळ गेला. त्यामुळे विलंब झाला.
येथील रस्त्यांची होणार सफाई
गंगापूर गाव-सीबीएस ते कॅनडा कॉर्नर-कॅनडा कॉर्नर ते भोसला शाळा प्रवेशद्वार-त्र्यंबक नाका सिग्नल ते सातपूर गाव-गडकरी चौक ते तिडके कॉलनी-महात्मा गांधी रस्ता, मेनरोड, नेहरू उद्यान, शालिमार-पंचवटी कारंजा ते रविवार कारंजाम चांडक सर्कल ते मुंबई नाका-मुंबई नाका ते अशोकस्तंभ
महापालिकेच्या वतीने शहरात चार यांत्रिकी झाडू आले असून, आरटीओकडून पासिंगची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. ऑपरेटर येताच शहरातील रस्त्यावर यांत्रिकी झाडूद्वारे काम सुरू केले जाईल.
- बाजीराव माळी, कार्यकारी अभियंता, यांत्रिकी विभाग