अल्पवयीन मुलीचा छुप्यारितीने विवाह, बाळाला दिला जन्म; कुटुंबाचं सीक्रेट उघड झालं
By अझहर शेख | Published: October 11, 2023 02:46 PM2023-10-11T14:46:33+5:302023-10-11T14:46:49+5:30
परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे अठरा वय पूर्ण नसतांना गेल्यावर्षी तिच्या कुटुंबातील सदस्यांनी दिंडोरीरोडवर असलेल्या एका हॉटेलात कूक म्हणून काम करणाऱ्या युवकाबरोबर विवाह लावून दिला होता
नाशिक : मुलीचे वय अठरा असल्याशिवाय कायद्याने विवाह लावून देता येत नाही मात्र असे असताना समाजात आजही चोरी छुप्या पद्धतीने बालविवाह केले जात असल्याचे अनेकदा समोर येते. म्हसरूळ शिवारात अशाच प्रकारची घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन बलिकेचा कुटुंबातील सदस्यांनी बालविवाह करून दिला. यानंतर बालिका गरोदर राहिली त्यातून तिने एका कन्या रत्नाला जन्म दिला. वैद्यकीय तपासणी दरम्यान जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या ही बाब लक्षात आली आणि घटनेचा पर्दाफाश झाला.
परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे अठरा वय पूर्ण नसतांना गेल्यावर्षी तिच्या कुटुंबातील सदस्यांनी दिंडोरीरोडवर असलेल्या एका हॉटेलात कूक म्हणून काम करणाऱ्या युवकाबरोबर विवाह लावून दिला होता. त्यानंतर काही दिवसांनी त्या बालिकेला पतीपासून दिवस गेले तर काही दिवसांपूर्वी तिला जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी तिने एका मुलीला जन्म दिला. अल्पवयीन माता असल्याचा जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना संशय आल्याने तिची वैद्यकीय तपासणी केली असता त्यात विवाहवेळी तिचे वय अठरापेक्षा कमी असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी पिडित अल्पवयीन मातेचा पती, सासू-सासरे, आई, वडील यांच्याविरूद्ध बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो), बलात्कार आणि बाल विवाह प्रतिबंध कायद्याच्या विविध कलमान्वये म्हसरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असतानासुद्धा तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले म्हणून पिडितेच्या पतीविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.