युरोपहून उडत आला राखी बगळा, आफ्रिकेतील तलवारचीही हजेरी!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 06:48 AM2023-12-18T06:48:14+5:302023-12-18T06:48:30+5:30
नांदूर-मधमेश्वरला देशी-विदेशी पक्ष्यांच्या हिवाळी संमेलनाने गाठली उंची
- अझहर शेख
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : रामसर दर्जाचा बहुमान असलेल्या नाशिकच्या नांदूर-मधमेश्वर अभयारण्याच्या पाणथळावर देशी-विदेशी पक्ष्यांचे हिवाळी संमेलन आता उंची गाठत आहे. या संमेलनाला युरोपहून खास राखी बगळा (ग्रे-हेरॉन), कॉमन क्रेन (सामान्य करकोचा) यासह आफ्रिकेतून तलवार बदकानेही हजेरी लावली आहे. पाणस्थळ अधिवासाला पसंती देणारे विविध करकोचे, बगळे, बदक मोठ्या संख्येने जलाशयावर विहार करताना नजरेस पडतात.
या पक्ष्यांचे घडले दर्शन...!
बदकांच्या प्रजातीमध्ये युरेशियन विजन (तरंग), गडवाल-सोनुला, चक्रांग, थापट्या (नाॅर्थन शॉवलर), लहान टिबुकली, तलवार बदक, कॉमन पोचार्ड (लहान लालसरी), चक्रवाक, ब्राह्मणी तसेच शेकाट्या, कल्लेदार सुरय, चित्रबलाक (पेंटेड स्टॉर्क), दर्वीमुख (स्पुनबिल) या पाणस्थळावरील पक्ष्यांचे दर्शन नांदूर- मधमेश्वरच्या भेटीत घडले. तसेच गवताळ भागातील वेडा राघू, जंगली सातभाई, खंड्या (किंगफिशर), सुगरण, चष्मेवाला, वटवट्या हे पक्षीसुद्धा नजरेस पडले.