शेतात खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून सहा वर्षीय बालकाचा मृत्यू
By धनंजय वाखारे | Published: September 8, 2023 01:31 PM2023-09-08T13:31:20+5:302023-09-08T13:32:41+5:30
गुरुवारी दिवसभर पावसाची रिपरीप सुरू झाल्यामुळे सर्वांनाच दिलासा मिळाला होता.
संजय देवरे , देवळा (नाशिक) : शेतातील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून केदा रविंद्र नामदास ह्या १ल्या इयत्तेतील सहा वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील खामखेडा येथे गुरुवारी दि.७ रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
खामखेडा येथे गेल्या अनेक वर्षांपासून मेंढपाळ व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले नामदास कुटुंबीय खामखेडासह परिसरात मेंढीपालन करून उदरनिर्वाह करतात. पाऊस नसल्यामुळे चाऱ्याचा सर्वत्र तुटवडा निर्माण झाल्यामुळे गत तीन महिन्यांपासून मांगबारी घाटातील नवश्या गणपती परिसरात तात्पुरता स्वरूपात पाल मांडून ते कुटुंबियांसह राहत होते.
गुरुवारी दिवसभर पावसाची रिपरीप सुरू झाल्यामुळे सर्वांनाच दिलासा मिळाला होता.नेहमीप्रमाणे रानात मेंढ्या चारून घरी परतल्यानंतर दुपारी साडे तीन वाजेच्या दरम्यान नामदास कुटुंबिय वाड्यावरील मेंढ्या आवरत असतांना रविंद्र पंडित नामदास यांना त्यांचा सहा वर्षाचा मुलगा केदा रवींद्र नामदास हा बराच वेळ न दिसला नाही. त्याच्या कुटुंबियांना त्याची आजूबाजुच्या परिसरात शोधाशोध केली असता तो शेजारीच शेतात पावसाचे पाण्याने भरलेल्या खड्डयात बुडालेला सापडला, त्याला उपचारासाठी त्वरीत देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरानी तपासून त्याला मृत घोषित केले असता त्याचे आईवडिलांसह नातेवाईकांनी एकच आकांत केला. शवविच्छेदनानंतर रात्री उशीरा शोकाकूल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.देवळा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.