नाशिककमधील एअर फोर्स स्टेशनमध्ये जवानाने ऑन ड्युटी स्वतःवर झाडली गोळी; दुर्दैवी मृत्यू
By अझहर शेख | Published: October 21, 2022 11:19 PM2022-10-21T23:19:10+5:302022-10-21T23:19:10+5:30
दिवाळीच्या सणाची लगबग सर्वत्र सुरू असताना अचानकपणे नाशिकमधील भारतीय वायुसेनेच्या जवनाने रात्रपाळी कर्तव्यावर असताना सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडली.
नाशिक :
दिवाळीच्या सणाची लगबग सर्वत्र सुरू असताना अचानकपणे नाशिकमधील भारतीय वायुसेनेच्या जवनाने रात्रपाळी कर्तव्यावर असताना सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडली. वीरेंद्र कुमार (२७,नेमुणूक एअरफोर्स स्टेशन, देवळाली) असे मृत्युमुखी पडलेल्या जवानाचे नाव आहे.
नाशिकमधील देवळाली कॅम्प छावणी चा परिसर हा लष्करी अस्थापनांचा परिसर म्हणून ओळखला जातो. या भागात कार्यरत असलेल्या दक्षिण वायुसेना स्टेशन मध्ये वीरेंद्र यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली. ही दुर्दैवी घटना गुरुवारी (दि.२०) मध्यरात्री घडली. रात्रपाळीच्या सुरक्षा कर्तव्यावर तैनात असताना त्यांनी अचानकपणे पिस्टलमधुन अंगावर गोळी झाडुन आत्महत्या केली. याबाबत देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये शुक्रवारी नोंद करण्यात आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. याबाबत पोलिसांकडून आता पुढील तपास केला जात आहे.
दरम्यान, अचानकपणे घडलेल्या या घटनेने स्टेशन परिसर हादरून गेला आहे. जवान विरेंद्र कुमार हे एअर फोर्स कर्मचारी वसाहतीच्या क्वार्टरमध्ये वास्तव्यास होते. त्यांच्या अशा अचानकपणे झालेल्या मृत्यूने शोककळा पसरली आहे. त्यांनी असे टोकाचे पाऊल का उचलले? याचा तपास पोलीस व लष्कर विभागाकडून केला जात आहे.