वकिली पेशा निष्ठेने जोपासणारे जायभावे प्रेरणास्रोत : अनिल सिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2022 01:29 AM2022-03-14T01:29:51+5:302022-03-14T01:30:19+5:30

आपल्या वडिलांकडून मिळालेला वकिली पेशाचा वारसा निष्ठेने जोपासत कठोर मेहनतीच्या जोरावर सातत्याने न्यायदान प्रक्रियेत महत्त्वाचे योगदान देण्यास अग्रेसर असलेले नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ञ जयंत जायभावे हे प्रत्येक वकिलासाठी एक प्रेरणास्रोत आहेत. त्यांच्या नेतृत्वामध्ये नाशिकला सातत्याने नवोदित वकिलांकरिता दर्जेदार व गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणपर कार्यक्रम राबविले गेले. त्यांच्या नेतृत्व कौशल्य व कुशाग्र बुद्धिमत्तेचा लाभ आता राष्ट्रीय पातळीवर होणार असल्याचे प्रतिपादन भारताचे अतिरिक्त महाधिवक्ता अनिल सिंग यांनी केले.

A source of inspiration for those who are loyal to the legal profession: Anil Singh | वकिली पेशा निष्ठेने जोपासणारे जायभावे प्रेरणास्रोत : अनिल सिंग

वकिली पेशा निष्ठेने जोपासणारे जायभावे प्रेरणास्रोत : अनिल सिंग

Next
ठळक मुद्दे नवोदित वकिलांना सातत्यपूर्ण प्रशिक्षण देणारे नाशिक एकमेव ‘चॅप्टर’

नाशिक : आपल्या वडिलांकडून मिळालेला वकिली पेशाचा वारसा निष्ठेने जोपासत कठोर मेहनतीच्या जोरावर सातत्याने न्यायदान प्रक्रियेत महत्त्वाचे योगदान देण्यास अग्रेसर असलेले नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ञ जयंत जायभावे हे प्रत्येक वकिलासाठी एक प्रेरणास्रोत आहेत. त्यांच्या नेतृत्वामध्ये नाशिकला सातत्याने नवोदित वकिलांकरिता दर्जेदार व गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणपर कार्यक्रम राबविले गेले. त्यांच्या नेतृत्व कौशल्य व कुशाग्र बुद्धिमत्तेचा लाभ आता राष्ट्रीय पातळीवर होणार असल्याचे प्रतिपादन भारताचे अतिरिक्त महाधिवक्ता अनिल सिंग यांनी केले.

बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यपदी महाराष्ट्रातून निवड झालेले शहरातील ज्येष्ठ विधिज्ञ जयंत जायभावे यांचा नाशिककरांच्यावतीने रविवारी (दि. १३) मनोहर गार्डन येथे जाहीर सत्कार सोहळा आयोजित करण्यात आल होता. या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून सिंग बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा, राज्याचे महाधिवक्ता ॲड. आशुतोष कुंभकोणी, माजी महाधिवक्ता ॲड. डॅरियस खंबाता, महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष वसंत साळुंके, उपाध्यक्ष राजेंद्र उमप, नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नितीन ठाकरे, ॲड. अविनाश भिडे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्कार समितीचे अध्यक्ष गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. मो. स. गोसावी हे होते.

यावेळी अनिल सिंग म्हणाले, भारतीय वकील परिषद ही जगातील दुसऱ्या क्रमांकावर असलेली मोठी परिषद आहे. या परिषदेच्या सदस्यपदी काम करण्याची संधी जायभावे यांना मिळाली आहे. कुंभनगरी म्हणून परिचित असलेल्या या शहरात सातत्याने न्यायव्यवस्था व त्याविषयीची ध्येय-धोरणे तसेच विधी शिक्षणाबाबत मंथन घडविणारा वकिलांचा कुंभमेळा त्यांच्या पुढाकाराने अनेकदा पार पडला अन् त्याचा लाभ संपूर्ण राज्याला नव्हे तर देशाला होतो, असे सिंग यांनी यावेळी अधोरेखित केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करत जायभावे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. ॲड. मनीषा भामरे यांनी सूत्रसंचालन केले. बार असोसिएशनचे सचिव ॲड. जालिंदर ताडगे यांनी आभार मानले.

--इन्फो--

पदव्युत्तर लॉ अभ्यासक्रम दोन वर्षांचा हवा : मो. स. गोसावी

बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विधी शिक्षणाचा अभ्यासक्रम पाच वर्षांचा असतो; मात्र पदवी उत्तीर्ण होऊन विधी शिक्षणाला प्रवेश घेऊ इच्छित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम तीन नव्हे तर दोन वर्षांचाच असायला हवा, जेणेकरुन विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाचण्यास मदत होईल, अशी सूचना डॉ. मो. स. गोसावी यांनी यावेळी मांडली. पदवीनंतरच्या विधी अभ्यासक्रमात (स्पेशलायाझेशन) असायला हवे, जेणेकरुन विधी शिक्षणाकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल वाढेल, असेही ते म्हणाले.

 

---इन्फो--

जलद न्यायासाठी प्रयत्नशील : जयंत जायभावे

नागरी सत्काराचा क्षण माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या क्षणाचे साक्षीदार माझ्या मातोश्री शकुंतला जायभावे, गुरुवर्य सर डॉ. मो. स. गोसावी हे उपस्थित असल्याने हा माझ्यासाठी दुग्धशर्करा योग आहे. वडिलांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजातील दुर्लक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी वेचले होते. त्यांचा वारसा मी चालवत असून, ते माझ्यासाठी मोठे आदर्श राहिले आहेत. यामुळे समाजातील उपेक्षितांना जलद गतीने न्याय कशाप्रकारे मिळेल, यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. विधी शाखेचे शिक्षण अधिक दर्जेदार होण्यासाठी आगामी काळात प्रयत्नशील राहणार आहे. तसेच वकिली क्षेत्रात कार्यरत नवोदित वकिलांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचा प्रयत्न असेल, असेही जायभावे सत्काराला उत्तर देताना म्हणाले.

Web Title: A source of inspiration for those who are loyal to the legal profession: Anil Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.