गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीतील मंडळ क्रमांकावरून पोलीस ठाण्यात वादळी बैठक
By अझहर शेख | Published: September 26, 2023 07:53 PM2023-09-26T19:53:51+5:302023-09-26T19:55:56+5:30
नाशकात गेल्या वर्षीची क्रमवारी 'जैसे-थे'
अझहर शेख, नाशिक : दरवर्षी गणेश विसर्जन मिरवणूकीत सहभागी होणाऱ्या २१ मंडळांच्या क्रम निश्चित करण्यासाठी भद्रकाली पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि.२६) उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी बैठक बोलविली होती. यावेळी काहीसा गोंधळ निर्माण होऊन पदाधिकाऱ्यांमध्ये वादविवाद सुरू झाले.पोलिसांनी मध्यस्ती करत नियमांची चौकट आखून दिली. मागील वर्षीप्रमाणे मंडळांचा क्रम कायम ठेवावा यावर सर्वांनुमते एकमत झाले. रेंगाळणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्याचा इशारा चव्हाण यांनी यावेळी बैठकीत दिला.
गणेश विसर्जनाच्या मुख्य मिरवणुकीतील सहभागी मंडळांचा क्रम निश्चित करण्यावरून दरवर्षी पोलिस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत गोंधळ उडतो. मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक होतात. मंगळवारीसुद्धा असेच काहीसे चित्र पहावयास मळाले. मतमतांतरांवरून वादविवाद यावेळी झाले. दुपारी साडेबारा वाजता भद्रकाली पोलिस ठाण्यात सर्वच प्रमुख सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी एकत्र जमले. नाशिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे, शिवसेवा मंडळाचे विनायक पांडे, संदीप कानडे, दंडे हनुमान मित्र मंडळाचे गजानन शेलार, भगतसिंग क्रांती दल मंडळाचे रामसिंग बावरी, युवक मित्र मंडळाचे प्रथमेश गीते, शिवमुद्रा मंडळाचे सत्यम खंडाळे, राजे छत्रपती मंडळाचे गणेश बर्वे यांच्यासह आदी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बैठकीत सुरूवातीला चिठ्ठी पद्धतीची मागणी काही मंडळांनी लावून धरली. दरम्यान, चव्हाण यांनी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला.
गोंधळ न घालता शांततेत चर्चा करण्याचे आवाहन यावेळी पदाधिकाऱ्यांना करण्यात आले.
...असा असणार क्रम
१) महानगरपालिका मंडळ २) रविवार कारंजा ३) गुलालवाडी व्यायाम शाळा, ४) भद्रकाली कारंजा, ५) श्रीमान सत्यवादी मंडळ, ६) सुर्यप्रकाश नवप्रकाश मंडळाचा नाशिकचा राजा, ७) सरदार चौक मंडळ, ८) रोकडोबा मंडळ, ९) शिवसेवा मित्र मंडळ, १०) शिवमुद्रा मंडळाचा मानाचा राजा, ११) युवक मित्र मंडळ, १२) दंडे हनुमान मित्र मंडळ, १३) युनायटेड फ्रेन्ड सर्कल, १४) शैनेश्वर युवक समिती, १५) नेहरू चौक मंडळ, १६) वेलकम सहकार्य मित्र मंडळ, १७) श्री गणेश मूकबधीर मित्र मंडळ, १८) युवा संघर्ष प्रतिष्ठाण, १९) गजानन मित्र मंडळ, २०) महालक्ष्मी चाळ सोशल फाउण्डेशन, २१) उत्कर्ष मित्र मंडळ
पोलिसांची नियमावली अशी...
- सकाळी ११ वाजता मिरवणूक सुरू होणार व रात्री १२ वाजता संपणार.
- मिरवणूक मार्गावर कुठलेही मंडळ रेंगाळत राहणार नाही.
- मंडळांना ठरवून दिलेली वेळमर्यादा पाळावी.
- जे मंडळ उशीरा येईल, ते शेवटी राहील. त्यांना क्रमावर दावा करू नये.
- मिरवणूकीत कोणत्याही मंडळाने डीजे साउंड सिस्टीम वापरू नये
- रेंगाळणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्यात येईल.
- मिरवणूक मार्गावर स्वागतसाठी डीजे साउंड लावता येणार नाही.
- स्वागत स्टेजवर कोणीही साऊंड सिस्टीमचा वापर करणार नाही
- स्वागतादरम्यान कोणालाही कुठल्याही मंडळाची आरती करता येणार नाही.
- गणेश मंडळांनी ढोल पथकातील वादकांची संख्या मर्यादित ठेवावी.
- सर्व मंडळांनी त्यांच्या दहा कार्यकर्त्यांचे आधारकार्डांसह हमीपत्र भरून द्यावे.