संदीप वाजेसह दोन मित्रांची कसून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2022 11:49 PM2022-02-07T23:49:22+5:302022-02-07T23:49:53+5:30

घोटी : नाशिक जिल्ह्याला हादरून टाकलेल्या डॉ. सुवर्णा वाजे यांच्या हत्या प्रकरणाचे गूढ हळूहळू उकलत आहे. पोलिसांनी या गुन्ह्यातील प्रमुख संशयित डॉ. वाजे यांचा पती संदीप वाजे याला अटक केल्यानंतर अनेक गोष्टी पोलिसांच्या तपासात समोर येत आहेत. सोमवारी (दि. ७) वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संशयित आरोपी वाजे व त्यांच्या दोन मित्रांची कसून चौकशी करण्यात आली आहे.

A thorough interrogation of two friends including Sandeep Waje | संदीप वाजेसह दोन मित्रांची कसून चौकशी

संदीप वाजेसह दोन मित्रांची कसून चौकशी

Next
ठळक मुद्देडॉ. सुवर्णा वाजे खून प्रकरण : वरिष्ठ अधिकारी तळ ठोकून

घोटी : नाशिक जिल्ह्याला हादरून टाकलेल्या डॉ. सुवर्णा वाजे यांच्या हत्या प्रकरणाचे गूढ हळूहळू उकलत आहे. पोलिसांनी या गुन्ह्यातील प्रमुख संशयित डॉ. वाजे यांचा पती संदीप वाजे याला अटक केल्यानंतर अनेक गोष्टी पोलिसांच्या तपासात समोर येत आहेत. सोमवारी (दि. ७) वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संशयित आरोपी वाजे व त्यांच्या दोन मित्रांची कसून चौकशी करण्यात आली आहे.
दि. २५ जानेवारीच्या रात्रीपासून डॉ. सुवर्णा वाजे बेपत्ता झाल्यानंतर वाडीवऱ्हे हद्दीतील रायगडनगरनजीक मिलिटरी गेटजवळ जळालेल्या कारमध्ये डॉ. सुवर्णा वाजे यांच्या हाडांचा सांगाडा आढळून आला. डीएनए अहवालानंतर डॉ. वाजे यांचा पतीच खुनी असल्याचे समोर आले. पोलिसांनी या गुन्ह्यातील प्रमुख संशयित संदीप वाजे याला अटक केली. कौटुंबिक कलह अन् त्यातून वारंवार होणाऱ्या भांडणातून मनपाच्या सिडको रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांची हत्या झाल्याच्या प्रकरणात प्रमुख संशयित संदीप वाजे यानेच कट रचून काटा काढला, असा संशय नातेवाइकांनी व्यक्त केला होता.
त्यानंतर पोलीसांना काही धागेदोरे सापडले असता, संदीप वाजे याला संशयित म्हणून अटक करण्यात आली. खुनाच्या आरोपाखाली न्यायालयाने संदीप वाजे याला ७ दिवस पोलीस कोठडी दिलेली आहे. त्याच तपासाला गती देण्यासाठी सोमवारी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात अतिरिक्त पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, पोलीस उपअधीक्षक अर्जुन भोसले दिवसभर तळ ठोकून होते. संशयित संदीप वाजे याची व त्याच्या दोन मित्रांची कसून चौकशी करण्यात आली.

अन्य साथीदारांचा शोध सुरू
खुनाचे गूढ उकलण्यासाठी संशयित आरोपी संदीप वाजे व त्याच्या दोन मित्रांच्या केलेल्या चौकशीत काय निष्पन्न झाले, हे गुलदस्त्यात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वेगवेगळ्या पद्धतीने तपासाची गती वाढविली जात असून, अन्य उर्वरित तीन संशयित साथीदारांचा पोलिसांकडून अजूनही शोध सुरू आहे.

Web Title: A thorough interrogation of two friends including Sandeep Waje

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.