शहीद पतीचे स्वप्न सत्यात उतरविणे हेच ‘व्हॅलेंटाइन गिफ्ट’; वीरपत्नी यशोदा गोसावी यांची भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 09:37 AM2022-02-14T09:37:46+5:302022-02-14T09:42:32+5:30

लग्नाला चार वर्षे पूर्ण होत नाहीत, तोच नियतीने गाठी तोडल्या. १७ नोव्हेंबर, २०१८ रोजी अतिरेक्यांना प्रत्युत्तर देताना सिन्नर तालुक्यातील शिंदेवाडीचे भूमिपुत्र मराठा बटालियनचे वीर जवान केशव सोमगीर गोसावी शहीद झाले होते 

A 'Valentine's Gift' is become a dream come true; Yashoda Gosavi Feelings wife of martyed Keshav Gosavi | शहीद पतीचे स्वप्न सत्यात उतरविणे हेच ‘व्हॅलेंटाइन गिफ्ट’; वीरपत्नी यशोदा गोसावी यांची भावना

शहीद पतीचे स्वप्न सत्यात उतरविणे हेच ‘व्हॅलेंटाइन गिफ्ट’; वीरपत्नी यशोदा गोसावी यांची भावना

googlenewsNext

अझहर शेख 

नाशिक : लग्नाला चार वर्षे होत नाहीत, तोच नियतीने पतीची साथ कायमची हिरावून घेतली. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत मराठा बटालियनचे वीर जवान केशव सोमगीर गोसावी शहीद झाले. त्यांच्या वीरपत्नी यशोदा यांनी स्वत:ला सावरले आणि पती केशव यांची अर्धवट राहिलेली स्वप्ने साकारण्यासाठी धैर्य व जिद्दीने वाटचाल सुरू ठेवली आहे. पतीची स्वप्नं सत्यात उतरविणं, हेच माझं त्यांच्यासाठी ‘व्हॅलेंटाइन गिफ्ट’ असेल, अशी भावना यशोदा यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.

लग्नाला चार वर्षे पूर्ण होत नाहीत, तोच नियतीने गाठी तोडल्या. १७ नोव्हेंबर, २०१८ रोजी अतिरेक्यांना प्रत्युत्तर देताना सिन्नर तालुक्यातील शिंदेवाडीचे भूमिपुत्र मराठा बटालियनचे वीर जवान केशव सोमगीर गोसावी शहीद झाले होते. यशोदा यांंनी पतीला तर सोमगीर गोसावी यांनी एकुलत्या मुलाला आणि बहिणीने भावाला कायमचे गमावले. मात्र, ‘काव्या’च्या जन्माने गोसावी कुटुंबामध्ये नवी उमेद आली.

सैन्यात भरती होण्यासाठी प्रयत्न
पत्नी व मुलांनी उच्चशिक्षण घ्यावे, असे केशव यांचे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी यशोदा यांनी दहावीनंतर थांबलेल्या शिक्षण पुन्हा सुरू केले. त्या स्वत: कला शाखेतून पदवीच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत आहेत. काव्यालाही उच्चशिक्षण देत, सैन्यदलात अधिकारी म्हणून बघायचे आहे, यासाठीच गावातून शहरात वास्तव्याला आल्याचे यशोदा यांनी सांगितले. पदवी पूर्ण झाल्यानंतर त्याही सैन्यात भरती होण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

व्यर्थ न हो बलिदान
माझे पती २०१८ साली शहीद झाले. १४ फेब्रुवारी, २०१९ रोजी पुलवामामध्ये भ्याड दहशतवादी हल्ला झाला. त्यामुळे ‘व्हॅलेंटाइन डे’ हा एक प्रकारचा ‘ब्लॅक डे’ आहे. या हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांचे स्मरण प्रत्येक भारतीयाने या दिवशी करत त्यांना श्रद्धांजली अर्पण करावी, हेच एक वीरपत्नी या नात्याने मी सांगू इच्छिते. सीमेवर कर्तव्य बजावणारे सैनिक अन् त्यांची प्रतीक्षा करत, इच्छा, आकांक्षांचा त्याग करणारे त्यांचे कुटुंबीय, यामुळेच आपण सर्व सण, उत्सव आनंदाने साजरे करू शकतो, याची जाणीव  ठेवायला हवी. - यशोदा गोसावी, वीरपत्नी.

Web Title: A 'Valentine's Gift' is become a dream come true; Yashoda Gosavi Feelings wife of martyed Keshav Gosavi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.