रस्त्यालगत झाडाखाली महिलेने दिला दोन बाळांना जन्म, डॉक्टरांची तत्परता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 07:28 AM2022-07-30T07:28:12+5:302022-07-30T07:29:38+5:30
पंचवटीतील प्रकार : सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टरांची तत्परता
नाशिक/ पंचवटी : औदुंबरनगर अमृतधाम रस्त्यावरून जाताना मोलमजुरी करणाऱ्या एका गरोदर महिलेच्या पोटात प्रसूतीपूर्व कळा निघू लागल्याने ती रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली थांबली व त्याठिकाणी प्रसूत झाल्याची घटना शुक्रवारी (दि.२९) दुपारी घडली. रस्त्याच्या कडेला प्रसूती झालेल्या महिलेने दोन गोंडस जुळ्या मुलींना जन्म दिला आहे.
सदर घटनेनंतर माजी नगरसेवक प्रियंका माने आणि धनंजय माने व डॉ. राजेंद्र बोरसे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व परिचारिकांनी घटनास्थळी धाव घेत प्रसूती प्रक्रिया पूर्ण करून माणुसकीचे दर्शन घडविले. शीतल विकी कांबळे असे त्या महिलेचे नाव आहे. कांबळे दाम्पत्य परिसरात मोलमजुरी करतात. शुक्रवारी दुपारच्या सुमारास कांबळे रस्त्याने जात असताना अचानक त्यांच्या पोटात प्रसूतीपूर्व कळा सुरू झाल्या. असह्य वेदना होत असल्याने त्या रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली बसल्या आणि काही वेळातच त्याच ठिकाणी त्या प्रसूत झाल्या. त्यांनी दोन मुलींना जन्म दिला. सदरची घटना रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी सदर माहिती धनंजय माने आणि जवळच्या रुग्णालयातील डॉ. राजेंद्र बोरसे यांना फोनवर दिली. त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी धाव घेतली आणि माने यांनी त्यांच्या वाहनात आरोग्य केंद्रातील डॉ. बस्ते तसेच परिचारिका वैशाली धिवर, छाया जाधव यांना घटनास्थळी पोहचविले.
ज्या ठिकाणी महिला प्रसूत झाली, त्या महिलेची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली. त्या महिलेने दोन गोंडस जुळ्या मुलींना जन्म दिला. त्यानंतर माने पंचवटी वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय देवकर यांचाशी संपर्क साधून रुग्णवाहिका बोलावून त्या महिलेला इंदिरा गांधी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले आहे. सदर महिला रस्त्यात झाडाच्या कडेला प्रसूत झाल्याचे निदर्शनास येताच काही महिलांनीदेखील घटनास्थळी धाव घेत मदत केली.