बैल धुण्यासाठी गेलेल्या तरुण शेतकऱ्याचा बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 07:50 PM2022-08-26T19:50:22+5:302022-08-26T19:51:15+5:30
ऐन पोळ्याच्या दिवशीच तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने कुसूर गावावर शोककळा पसरली असून पोळा सणावर विरजण पडले आहे.
जळगाव नेऊर (नाशिक) - येवला तालुक्यात पोळा सणाच्या दिवशी दुर्दैवी घटना घडली आहे. कुसूर येथे बैल धुण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाझर तलावात बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी २६ आगस्ट रोजी बैलपोळा या बळीराजाच्या महत्त्वाच्या सणाच्या दिवशीच कुसूर येथील मधुकर उत्तम गायकवाड (३५) हा शेतकरी बैल धुण्यासाठी गेला असता पाझर तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
ऐन पोळ्याच्या दिवशीच तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने कुसूर गावावर शोककळा पसरली असून पोळा सणावर विरजण पडले आहे. दोन-तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर पाझर तलावातून मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेची माहिती पोलीस पाटील मनोहर गायकवाड यांनी पोलिसांना दिल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय येवला येथे पाठवण्यात आला. सदर घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून तलावातून मृतदेह बाहेर काढण्यासाठी सरपंच संजय गायकवाड, ऋतिक उगले, चेतन चव्हाण, अभिषेक चव्हाण, गुड्डू हिंगे, बाळासाहेब पवार, गोरख आबा पवार, दीपक गायकवाड यांनी परिश्रम घेतले. पोलीस निरीक्षक अनिल भवारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक भिसे, पोलीस हवालदार बाळासाहेब फसाले, नितीन पानसरे तपास करत आहे.