अबब, ८२ जागांसाठी तब्बल २१ हजार उमेदवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 01:22 AM2018-03-13T01:22:11+5:302018-03-13T01:22:11+5:30
नाशिक ग्रामीण पोलीस दलातील शिपाई पदाच्या रिक्त ८२ जागांच्या भरतीप्रक्रियेस सोमवार (दि़१२) पासून आडगाव पोलीस मुख्यालयातील मैदानावर सुरुवात झाली़ २१ हजार ८४ उमेदवारांनी यासाठी आॅनलाइन अर्ज केले असून १२ ते २३ मार्च या कालावधीत प्रतिदिन एक हजार दोनशे उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली आहे़
नाशिक : नाशिक ग्रामीण पोलीस दलातील शिपाई पदाच्या रिक्त ८२ जागांच्या भरतीप्रक्रियेस सोमवार (दि़१२) पासून आडगाव पोलीस मुख्यालयातील मैदानावर सुरुवात झाली़ २१ हजार ८४ उमेदवारांनी यासाठी आॅनलाइन अर्ज केले असून १२ ते २३ मार्च या कालावधीत प्रतिदिन एक हजार दोनशे उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली आहे़ भरतीच्या पहिल्या दिवशी ७९९ पात्र उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली़ दरम्यान, मैदानी चाचणीस सुरुवात होऊनही ओळखपत्र व शेड्यूल न मिळालेल्या उमेदवारांनी यावेळी गर्दी केली होती़ ग्रामीण पोलीस शिपाई ८२ जागांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची संख्या पाहाता एका पदासाठी २५७ उमेदवार अशी संख्या आहे़ या भरतीमध्ये खुल्या गटासाठी- २१, अनुसूचित जाती- १३, अनुसूचित जमाती- २२, विमुक्त जमातीअ- २, भटक्या जमाती ब- २, भटक्या जमाती क- २, भटक्या जमाती ड- २, विशेष मागास प्रवर्ग- ६ तर इतर मागासवर्गीय- १२ जागा आहेत़ या पदासांठी २१ हजार ८४ उमेदवारांनी आॅनलाइन अर्ज भरले असून, सोमवारपासून प्रतिदिन एक हजार २०० उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलावले आहे़
सोमवारी बोलावण्यात आलेल्या १ हजार २०० उमेदवारांपैकी ८९५ उमेदवार हजर तर ३०५ उमेदवार गैरहजर होते़ यापैकी ९५ उमेदवार अपात्र तर एका उमेदवाराने माघार घेतल्याने उर्वरित ७९९ पात्र उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली़ त्यामध्ये १०० मीटर रनिंग, पुलअल्स, गोळाफेक, लांबउडीचा समावेश होता़ तर पात्र उमेदवारांची सोळाशे मीटर रनिंग मंगळवारी (दि़१३) सकाळी घेतली जाणार आहे़
पोलीस भरतीची सर्व प्रक्रिया आॅनलाइन असून, ओळखपत्र वा शेड्यूल पुढील काही दिवसांत उमेदवारांना कळेल़ याउपरही काहींना ओळखपत्र वा शेड्यूल न मिळाल्यास अशा उमेदवारांबाबत पोलीस महासंचालक कार्यालयास कळवून त्यांच्या मार्गदर्शनातून या उमेदवारांबाबत निर्णय घेतला जाईल़ - संजय दराडे, पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण़