"एकटाच चाळीस गद्दारांना घरी बसवेन"; आदित्य ठाकरेंनी रणशिंग फुंकले
By श्याम बागुल | Published: July 22, 2023 04:05 PM2023-07-22T16:05:03+5:302023-07-22T16:06:32+5:30
नाशिक येथे आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते.
नाशिक : जे म्हणत हाेते फंड देत नाहीत, आम्हाला त्रास देवून मतदार संघ गिळायला निघालेत ते आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले. विधीमंडळात त्यांचे चेहरे काळंवडल्याचे आपण पाहिले आहे. जनता शिवसेनेच्या सोबत आहे. अजून कोणाला जायचे आहे त्यांनी खुशाल जावे जनतेच्या बळावर आपण एकटेच चाळीस गद्दारांना घरी बसवू असा विश्वास व्यक्त करून युवा सेनेेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी, ज्यांच्या भाळी गद्दारीचा शिक्का बसला आहे अशांना विस्तारात मंत्रीपद मिळणार नाही हे लिहून ठेवा असा दावाही केला.
नाशिक येथे आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. राज्यात अलिबाबा चाळीस चोर सत्तेत सहभागी झाले आहेत. वर्षभरापासून फक्त घोेषणाच केल्या जात आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम करण्यात आले. परंतु त्यानंतर जे काही घडले ते पाहता राज्यात राजकीय पक्षांची दलदल झाली आहे. कोण कोठे बसले व कोणाला जावून मिळाले हे कळायलाच तयार नाही. ज्या मतदारांनी निवडून दिले, त्यांच्याशी प्रतारणा करण्यात आली आहे असा आरोप करून सध्या महाराष्ट्राला व मुंबईला तोडण्याचे काम सुरू आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्री दिल्ली समोर दर दोन दिवसाआड झूकत असून उठसूठ दिल्लीला मुजरा करण्यासाठी मुख्यमंत्री जाणार असतील तर महाराष्ट्रातील जनतेचे अश्रू कोण पुसणार असा सवालही ठाकरे यांनी केला.