‘आॅन ड्यूटी’ जीन्स, टी-शर्ट नको : आरती सिंह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 12:40 AM2019-03-25T00:40:13+5:302019-03-25T00:40:49+5:30
‘आॅन ड्यूटी’ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय असो किंवा पोलीस ठाणे कोठेही जीन्स, टी-शर्ट परिधान करू नये, असे फर्मान शिस्तप्रिय व धाडसी अधिकारी म्हणून ओळख असलेल्या ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी काढले आहे.
नाशिक : ‘आॅन ड्यूटी’ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय असो किंवा पोलीस ठाणे कोठेही जीन्स, टी-शर्ट परिधान करू नये, असे फर्मान शिस्तप्रिय व धाडसी अधिकारी म्हणून ओळख असलेल्या ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी काढले आहे.
जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयांसह पोलीस ठाण्यांमध्ये कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी सर्रासपणे एखाद्या महाविद्यालयीन मुलासारखे जीन्स, टी-शर्ट परिधान करून वावरत असल्याचे सिंह यांच्या निदर्शनास आले. ‘खाकी वर्दी’ नागरिकांसाठी दिलासा देणारी तर गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण करणारी आहे. या वर्दीचा अभिमान बाळगत पोलिसांनी कर्तव्य बजावत असताना वर्दीला प्राधान्य देणे गरजेचे आहे.
गुन्हे शोध पथक किंवा स्थानिक गुन्हे शाखेत कर्तव्य बजावणारे अधिकारी-कर्मचारी यांनी गोपनीयतेच्या दृष्टीने सर्वसाधारण ड्रेसचा (फॉर्मल) वापर केल्यास हरकत नसल्याचे सिंह यांनी कार्यालयीन आदेशामध्ये म्हटले आहे. मात्र सरसकट सर्वांनीच जीन्स, टी-शर्ट घालून मिरवू नये, असे बजावले आहे.
दोन दिवसांपूर्वीच सिंह यांच्या आदेशान्वये ग्रामीण मुख्यालयातील उपअधीक्षक सुरेश जाधव यांच्या स्वाक्षरीने कार्यालयीन आदेश जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रमुखांसह उपविभागीय कार्यालयांमध्ये हा आदेश ई-मेलद्वारे धाडण्यात आला आहे. कार्यालयीन शिस्तीचा भाग म्हणून आपण शासकीय नोकरदार असल्याची जाणीव ठेवून कार्यालयीन शिस्तीचे पालन करणे आपली जबाबदारी असल्याचे अप्रत्यक्षपणे सिंह यांनी आदेशामधून सांगितले आहे.
सर्वसामान्य नागरिक आपली तक्रार घेऊन जेव्हा एखाद्या पोलीस ठाण्यात प्रवेश करतो, तेव्हा त्याच्यासमोर जीन्स, टी-शर्टमध्ये अधिकारी-कर्मचारी येतात तेव्हा त्यांच्या मनात वेगळीच छबी तयार होते. तसेच आपण ज्यांच्याकडे तक्रार घेऊन आलो आहोत, ते आपल्या कार्यालयीन कामकाजाविषयी खरेच गंभीर आहेत का? असा प्रश्नदेखील पोशाखावरून उपस्थित होण्याची शक्यता असते.
ग्रामीण पोलीस दलात बेशिस्तीचा कळस गाठला गेल्याचे दिसून येते. एखाद्या शाळेत जेव्हा विद्यार्थी गणवेशात येत नाही तेव्हा, शिक्षक त्याला शिक्षा करतात व उद्यापासून गणवेशात येण्यास बजावतात. तशीच वेळ नव्याने सूत्रे हाती घेतलेल्या पोलीस अधीक्षक आरती सिंह यांच्यावर आली, यावरून ग्रामीण पोलिसांमधील बेशिस्तीची वागणूक पुन्हा अधोरेखित झाली. पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शासकीय गणवेशात कर्तव्यावर हजर रहावे, असे आदेश सिंह यांना रीतसर काढावे लागले यावरून सगळे स्पष्ट होते.