आरतीचा हुंड्यासाठी खून
By admin | Published: April 8, 2017 12:50 AM2017-04-08T00:50:41+5:302017-04-08T00:50:41+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; नव्याने तपास करण्याची मागणी
कोल्हापूर : नाशिक येथे आरती पाटील-सावकार हिचा हुंड्यासाठी खून झाल्याचा संशय व्यक्त करीत या प्रकरणी नव्याने तपास करावा, संशयितांना व्हीआयपी वागणूक देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. भारतीय महिला फेडरेशनने या मोर्चाचे आयोजन केले होते.
आरती हिने नाशिक येथे २ एप्रिल ला आत्महत्या केली होती. याप्रकरणी संशयितांना अटक झाली होती; परंतु सावकार परिवाराच्या दबावापोटी हा तपास नीट होत नसल्यामुळे कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दुपारी तीन वाजता आरतीच्या माहेरच्या परिसरातील नागरिक, विवेकानंद कॉलेज, ‘केआयटी’मधील विद्यार्थी हे मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर आले. आरतीचा लग्नातील मोठा फोटो मोर्चाच्या अग्रभागी होता.
फेडरेशनच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षा डॉ. मेघा पानसरे, सचिव ज्योती भालकर, शिवसेनेचे शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस, आरतीचे वडील अॅड. बी. एम. पाटील, आई पूजादेवी यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
आरतीचा सासरी हुंड्यासाठी छळ होत होता. आरतीच्या डायरीतूनही तशी माहिती मिळाली आहे. तिचा हुंड्यासाठी खून झाल्याचा संशय असून, आरोपींना पाठीशी घालणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, स्वतंत्र अधिकाऱ्यामार्फत नव्याने तपास व्हावा, आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. आरतीचे सासरे आप्पासाहेब सावकार हे नाशिकमधील मोठे उद्योजक आहेत. त्यामुळे तपास अधिकाऱ्यांवर दबाव येत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
संजय शिंदे यांचा थेट नाशिकला फोन
निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी थेट नाशिकच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना फोन लावून या प्रकरणाचे कोल्हापुरात तीव्र पडसाद उमटले असून, संबंधितांना त्याची कल्पना देण्याची सूचना त्यांनी केली. संबंधित तपास अधिकाऱ्यांना बदलले असल्याची माहिती यावेळी शिंदे
यांनी दिली.
मुलींना जन्मच देऊ नका
आरतीच्या आई पूजादेवी यांनी सुखात वाढलेल्या माझ्या लेकीवर ही वेळ आली. आता मुलींना जन्म देऊ नका, असेच मी सगळीकडे सांगणार आहे, अशा शब्दांत त्रागा व्यक्त केला. मुलीला जन्म द्या म्हणून नरेंद्र मोदी सांगतात. मग अशा या प्रकरणामध्ये कठोर कारवाई व्हायला नको का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
रविवारी कॅँडल मार्च
आरतीला श्रद्धांजली वाहण्यासाठी व आरोपींवर कारवाई व्हावी यासाठी रविवारी (दि. ९) सायंकाळी कॅँडल मार्चचे आयोजन केले आहे. ‘केआयटी’च्या माजी विद्यार्थ्यांच्यावतीने हा मार्च काढण्यात येणार आहे. यावेळी सर्वजण काळा शर्ट परिधान करणार आहेत.
नाशिकमध्ये बॅटरी
मिळत नाही का ?
आरतीचे वडील अॅड. पाटील म्हणाले, कोल्हापूरला ट्रॅव्हल्सने येताना तिच्या नवऱ्याने गळा दाबण्याचा प्रयत्न केला होता. तिचे शवविच्छेदन इन कॅमेरा करावे, अशी मागणी केल्यानंतर कॅमेऱ्याची बॅटरी उतरली म्हणून शुटिंग करणाऱ्याला गायब केले गेले. नाशिकमध्ये कॅमेऱ्याची बॅटरी मिळत नाही का ? आरोपींना बाहेरून जेवणाचे डबे आणल्यावर स्वत: पोलिस अधिकाऱ्यांनी उठून त्यांना डबे नेऊन दिले. याबाबत विचारताच काही गोष्टी अॅडजस्ट कराव्या लागतात, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांकडे तक्रार : चंद्रदीप नरके
आरती गौरव सावकर हिच्या हत्येची चौकशी करून आरोपींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
नाशिकमध्येही निघणार मोर्चा
महिला फेडरेशनची नाशिक शाखा आता तेथेही मोर्चा काढून आरतीच्या मृत्यूचा जाब विचारणार आहे. सर्व मानवाधिकार संघटनांशी आमची चर्चा सुरू असून, त्याही या लढ्यात उतरतील, असे डॉ. मेघा पानसरे यांनी यावेळी सांगितले.